रत्नागिरी: अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयांमध्ये घडलेल्या आगीच्या दुर्दैवी घटनांनंतर संपूर्ण राज्यातील आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शासकीय, खासगी तसेच धर्मादाय रुग्णालयांचे तातडीने फायर ऑडिट करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. या आदेशांची तात्काळ अंमलबजावणी करत रत्नागिरी जिल्ह्यातही रुग्णालय सुरक्षेसाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील मुख्य शासकीय रुग्णालयासह तीन उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांचे फायर ऑडिट वेगाने केले जात असून, बहुतांश ठिकाणचे परीक्षण पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी दिली आहे.
दर सहा महिन्यांनी प्रत्यक्ष अग्निसुरक्षा यंत्रणेची तपासणी
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कार्यकक्षेत दापोली, कळंबणी आणि कामथे ही महत्त्वाची तीन उपजिल्हा रुग्णालये येतात. याशिवाय मंडणगड, गुहागर, देवरूख, संगमेश्वर, लांजा व रायपाटण या ग्रामीण रुग्णालयांमध्ये दररोज शेकडो नागरिक उपचारासाठी येत असतात. या सर्व ठिकाणी आगीसारख्या दुर्घटना घडू नयेत म्हणून अग्निसुरक्षा यंत्रणा सक्षम ठेवण्यावर भर दिला जात आहे. डॉ. जगताप यांनी स्पष्ट केले की, रुग्णालयांमधील अग्निरोधक उपकरणांची केवळ तपासणीच नव्हे, तर दर सहा महिन्यांनी त्यांची कार्यक्षमता प्रत्यक्ष तपासून (मॉक ड्रिल व चाचणी) पाहिली जाते. सद्यस्थितीत जिल्ह्यातील बहुतांश रुग्णालयांचे फायर ऑडिट पूर्ण झाले असून रुग्णालये सुरक्षित स्थितीत आहेत.
ग्रामीण भागातील २६७ प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कडक नजर
केवळ शहरांपुरते मर्यादित न राहता ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणाही सुरक्षित राहावी यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग तत्पर झाला आहे. जिल्ह्यातील २६७ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये दरवर्षी नियमितपणे फायर ऑडिट राबवले जाते, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली. या ऑडिट दरम्यान ऑक्सिजन सिलिंडरचा साठा, विद्युत वायरिंग, जनरेटर कक्ष, औषध साठवण कक्ष तसेच इतर ज्वलनशील साहित्याची अत्यंत बारकाईने तपासणी केली जाते, जेणेकरून कोणत्याही संभाव्य धोक्याची वेळीच विल्हेवाट लावता येईल.
शॉर्टसर्किट रोखण्यासाठी इलेक्ट्रिक ऑडिटवर भर
रुग्णालयांमध्ये लागणाऱ्या आगीच्या घटनांमध्ये सर्वाधिक प्रमाण शॉर्टसर्किट किंवा विद्युत बिघाडाचे असते. हा धोका ओळखून दरवर्षी रुग्णालयांचे इलेक्ट्रिक ऑडिटही अनिवार्य करण्यात आले आहे. यंदाही तज्ज्ञ इलेक्ट्रिशियनमार्फत जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयातील ट्रान्सफॉर्मर, वायरिंग, स्विच बोर्ड आणि उपकरणांच्या विद्युत भाराची (Load Capacity) सखोल तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.

