जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ मोहित कुमार गर्ग यांनी जनतेला आपल्या जवळपास सुरु असलेल्या अवैध धंद्याविषयी माहिती देण्यासाठी व्हॉट्सॲप नंबर दिला होता. पोलिसांची प्रकरणे अंगाला लागू नये यासाठी सामान्य जनता अशा धंद्यांकडे दुर्लक्ष करते आणि मग असे धंदे जास्त फोफावतात.
रत्नागिरी पोलिसांमार्फत नुकतेच एक आवाहन करण्यात आले होते कि, आपल्या भागातील अवैध व्यवसायांबद्दल माहिती द्यावी, तुमची माहिती गुप्त ठेवण्यात येईल. त्यामुळे आता काही जागरूक नागरिकांनी या नंबरवर कॉल करून अवैध धंद्यांची माहिती देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आता हळूहळू अवैध धंदे उघडकीस येऊ लागले असून ते आता बंद होण्याची चिन्हे आहेत.
कालच रत्नागिरी बाजारपेठेमध्ये नवीन भाजीमार्केट येथे बेकायदेशीर आणि बिगरपरवाना सुरू असलेल्या क्लबवर पोलिसांनी रात्री धाड टाकली. त्यामध्ये रोख रकमेसह विविध साहित्य आणि संशयितांच्या मोबाईलसह १ लाख ४४ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या धाडीमध्ये १५ संशयित सापडले असून, याप्रकरणी १५ जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये मच्छीमार, व्यावसायिक, व्यापारी, पत्रकार आदींचा समावेश आहे.
उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून शहर पोलिसांनी बुधवारी रात्री ९ वाजता या क्लबवर धाड टाकली. संशय़ित गैरकायदा, विनापरवाना जुगार अड्डा चालवून फायद्यासाठी रमी जुगार खेळत असल्याचे आढळून आले. त्यावरून पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४, ५ अन्वये गुन्हा दाखल केला गेला आहे. तसेच या धाडीमध्ये पोलिसांकडून टेबल,बॉक्स, काही रोकड, खुर्ची,ॲल्युमिनियमची पेटी, लॅण्डलाईन फोन, मोबाईल असे एकूण १ लाख ४४ हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.