मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टी, पूरपरिस्थितीमुळे अनेक जिल्हे बाधित आहेत. मानवतेच्या दृष्टिकोनातून नेहमीप्रमाणे अत्यंत गरीब व बळीराजाच्या मदतीसाठी रत्नागिरीतील हेल्पिंग हँड्सच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाणार आहे. प्रशासनाच्या सहकायनि येत्या १० ऑक्टोबरपर्यंत निधी संकलन करून त्याचे योग्य वितरण केले जाणार असून, प्रत्येक व्यवहार पारदर्शक राहील, अशी खबरदारी घेण्यात येत असल्याचे हेल्पिंग हँड्सतर्फे पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर घरे, पीक, जनावरांचे नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्य व केंद्र सरकारकडून मदत करण्यात येत आहे. त्यांच्या मदतीला हेल्पिंग हँड्सतर्फेही मदत केली जाणार आहे. सेवेतून मानवता, मानवतेतून राष्ट्र या प्रेरणेने वेळोवेळी आपत्कालीन परिस्थितीत हेल्पिंग हँड्सच्या स्वयंसेवकांनी जिवाची पर्वा न करता मदतीचा हात पुढे केला आहे.
२०१९ ला सांगली, कोल्हापूरचा महापूर, २०१९ सैन्यभरती, २०२० कोविड, २०२० निसर्ग चक्रीवादळ, २०२१ चिपळूणचा महापूर अशा आपत्कालीन परिस्थितीत हेल्पिंग हँड्सने मदतीचा हात दिला आहे. मराठवाड्याच्या मदतीसाठी हेल्पिंग हँड्सच्या बैठकीत वस्तुरूपी मदत न देता आर्थिक स्वरूपात मदतीचा निर्णय झाला. त्याच वेळी जवळपास २ लाख रुपये जमा केले. प्रशासन सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.
मदतनिधी केंद्र – हेल्पिंग हँड्सचे महाराष्ट्र बँकेत खाते उघडण्यात आले आहे. त्यावरही पैसे भरता येतील तसेच हॉटेल हर्षा, टीआरपी, वेद इलेक्ट्रॉनिक्स, साळवी स्टॉप, हॉटेल गोपाळ, मारुती मंदिर, मानस जनरल स्टोअर्स, स्वयंवर मंगल कार्यालयासमोर माळनाका, नोटरी श्रद्धा ढेकणे, जावकर प्लाझा जयस्तंभ, मलुष्टे स्टील अँड पाईप्स बाजारपेठ, रामआळी, जैन अँड जैन, आठवडा बाजार आणि हॉटेल सी फॅन्स, मांडवी येथे निधी देता येईल.