रत्नागिरीतील जयगड परिसरामध्ये अनेक कंपन्या कार्यरत असून, त्यांच्याशी निगडीत विविध वाहनांची वाहतूक त्या परिसरामध्ये कायम सुरु असते. अनेक वेळा स्थानिकांना देखील वस्तीमधून होणाऱ्या अशा प्रकारच्या वाहतुकीचा त्रास सहन करावा लागतो. जयगड परिसरात असलेल्या आंग्रे पोर्ट परिसरात उतरवण्यात येणाऱ्या कोळशामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्यामुळे परिसरातील विहिरीचे पाणी प्रदूषित झाल्या आहेत.
त्यामुळे जनतेला वेठिस धरणाऱ्या या कंपनी विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय नागरी व पर्यावरण राष्ट्रीय संस्थेचे नंदू केदारी यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे निवेदनाद्वारे केली आहे. जयगड येथील चाफेरी परिसरानजीक आंग्रे बंदर आहे. या बंदरावर कोळसा उतरवण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी कोळसा उतरवण्यासाठी आवश्यक परवानगी कंपनीने घेतली आहे का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याशिवाय कोळसा साठा करून ठेवण्यासाठी बंदरावर इतर कोणतीही वेगळी व्यवस्था करण्यात आलेली नाही.
वाऱ्यासोबत कोळसा पावडर परिसरातील घरांमध्ये, विहिरींमध्ये आणि खाडी व समुद्रात उडते. त्यामुळे होणाऱ्या प्रदुषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार केदारी यांनी केली आहे. या शिवाय ही कोळशाची पावडर लगतच्या परिसरामध्ये असणाऱ्या आंबा कलमांवर देखील उडत असून त्याचा दुष्परिणाम फळांच्या उत्पन्नावर होत असून, झाडे देखील कालांतराने मृत होण्याची शक्यता वर्तवली आहे.
सोबतच आरोग्यावर होणाऱ्या परिणामामुळे देखील, जसे हवेतून कोळसा पावडर श्वसनाद्वारे शरीरात जाऊन श्वसनाचे विकार होण्याचा धोका निर्माण झाला आहे तरी संभावित धोका लक्षात घेता आपण उचित कारवाई करून येथील ग्रामस्थांना दिलासा द्यावा, असे केदारी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.