पाली येथील एक महिला रुग्ण उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी मध्ये दाखल झाल्या होत्या. सदर महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृत्यू दरम्यान तिच्या अंगावर असलेल्या दोन सोन्याच्या बांगड्या अंत्यसंस्काराच्या वेळी गायब असलेल्या दिसल्या, त्यामुळे त्यांची नात तिने याबाबत संबंधित विभागातील कर्मचारी यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.
रत्नागिरी सारख्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा घटना घडायला लागल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. रुग्णालयाच्या बेजबाबदार कारभाराबद्दल मृत महिला यांची नात समीक्षा पाटील यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या नावे अर्ज लिहून सदरचा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवला. या अर्जामध्ये त्याने सविस्तरपणे म्हटले आहे की, त्यांची आजी कोविड पॉझिटिव्ह निघाल्याने त्यांना उद्यम नगर येथील कोविड महिला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांची ऑक्सिजन लेवल कमी होत असल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले, तेव्हा त्यांच्या हातामध्ये दोन सोन्याच्या बांगड्या होत्या आणि ही बाब त्यांनी तेथील वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली पण तेव्हा उपचार चालू असल्याने बांगड्या काढता येऊ शकत नाहीत असं त्यांना सांगण्यात आलं.त्यानंतर उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू ओढवला असून अंत्यसंस्कारानंतर सुद्धा हातातील दोन्ही बांगड्या नातेवाईकांना देण्यात आल्या नाहीत याबद्दल त्यांनी वरिष्ठ कर्मचाऱ्यांना विचारले असता त्यांनीदेखील कार्यरत कर्मचार्यांना विचारणा केली परंतु त्यांच्याकडून व्यवस्थित उत्तरे मिळाली नाहीत.
अखेर मृताच्या नातेवाइकांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन देऊन सदर प्रकरणाबद्दल शोध लावून चोरी करणारे कर्मचाऱ्याला त्वरित शासन करून त्या सोन्याच्या दोन बांगड्या त्वरित मिळवून द्यावा अशी विनंती केली अन्यथा आम्हाला हे प्रकरण पोलिस स्टेशनमध्ये न्यावे लागेल असे देखील सांगितले. त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी केल्यानंतर एका कंत्राटी कामगाराने या दागिन्यांची चोरी केल्याचे निदर्शनास आले. त्याच्याकडून सदरचे दागिने हस्तगत करून नातेवाईकांकडे सुपूर्त करण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे संबंधित आरोपीला त्याने केलेल्या गुन्ह्याबद्दल कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन देखील देण्यात आले आहे.