रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा धोका वाढल्याने वाढीव ७ दिवस कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रत्नागिरी मध्ये इतर जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. फक्त अत्यावश्यक सेवेमध्ये मोडणाऱ्या वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. तरीही कित्येक वाहने विना परवाना तसेच कोरोना निगेटिव्ह चाचणीचा अहवाल सोबत न बाळगता जिल्ह्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना दिसली आहेत. परंतु अशा वाहनांची रत्नागिरी सीमेवर कशेडीमध्ये कसून तपासणी केली जात आहे.
जिल्ह्यातील पोलिसांच्या असलेल्या वक्रदृष्टीमुळे आणि सतर्कतेने आज जिल्हा सुरक्षित आहे. कोणत्याही लहान मोठ्या वाहनांची सुद्धा व्यवस्थित तपासणी करूनच पुढे कार्यवाही केली जाते आहे. कोरोनाची ब्रेक द चेन अंतर्गत कडक लॉकडाऊन मध्ये नियमांत कोणासाठीही शिथिलता आणण्यात येणार नाही असे जिल्हा पोलीस निरीक्षक डॉ. गर्ग यांनी आधीच सांगितले होते. त्यामुळे परजिल्ह्यातून विना परवाना आणि ई-पास नसलेल्यांना आणि ४२ तास आधीचा कोरोना अहवाल नसणार्यांना अगदी मुंबई वरून आलेल्या वाहनांना सुद्धा सिमेवरूनच माघारी पाठविण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी कशेडीची सीमा लागते. तिथे खेड पोलीस ठाण्याकडून नाकाबंदी करण्यात आली असून, पोलीस विभागामार्फत जादाच्या पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांची नेमणूक करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस निरीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग, उपविभागीय पोलीस अधिकारी काशीद, खेड पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी परजिल्ह्यातून रत्नागिरी मध्ये प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांना शासनाने आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन न करता जबाबदारीने वागण्याचे वागण्याचे आवाहन केलं आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.