कोकणाला लाभलेले विशाल समुद्र किनारे हे कायमच पर्यटकांसाठी आकर्षण ठरले आहे. वेगवेगळ्या भागातील समुद्रांचे विशेष असे वैशिष्ट्य कायमच दिसून येते. मागील काही वर्षापासून काही ठराविक हंगामामध्ये म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत रत्नागिरीतील किनारे पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहेत. रात्रीच्या वेळी किनार्यावर दिसणार्या चमकणाऱ्या निळ्या लाटा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत.
गेले तीन दिवस गणपतीपुळे समुद्र किनार्यावर निळ्या रंगाने चमकणार्या लाटा पहायला मिळत आहेत. त्याबाबत संशोधक सरसावले असून, नॉकटील्युका हा एकपेशीय डायनोफ्लॅजेलेट गटात मोडणारा प्राणी एक प्रकारचा प्लवंग आहे. डोळ्यांनी दिसू शकणारा हा सूक्ष्मजीव, आपल्या शरीरातून काजव्यासारखा जैविक प्रकाश निर्माण करू शकतो. खळबळणार्या, उसळणार्या लाटांमुळे हे प्राणी उद्दीपित होतात आणि या निळसर प्रकाशाने चमकू लागतात.
नॉकटील्युका सिंटीलांस या शास्त्रीय नावाने ओळखला जाणारा हा प्राणी सध्या समुद्रात दिसणार्या निऑन लाईट्स सारख्या हिरव्या निळ्या प्रकाशाने चर्चेत आला आहे. समुद्रावर वावरणाऱ्या पर्यटकांच्या आकर्षणचा विषय बनला आहे. सी स्पार्कल म्हणूनही तो ओळखला जातो. उत्तर अरेबियन समुद्र ते अरेबियन पेनिन्सुला दरम्यान हे प्राणी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. दिवसा लालसर रंगाने दिसणारा हा प्राणी सध्या हिरवट रंगाचा दिसून येत आहे. दिवसा पाण्यावर हिरवट शेवाळासारखा थर दिसून येत आहे.
जलचरांची सूक्ष्म पिल्ले, अंडी यावर उपजीविका करणारा हा प्राणी, म्हणूनच अन्न उपलब्ध नसेल तरीही जगू शकतो. त्यात मोठ्या प्रमाणात साठणार्या अमोनिया मुळे जेलीफिश सोडल्यास इतर कोणी त्याला खात नाहीत. किनार्याकडे सूक्ष्म खाद्याची उपलब्धता आणि वातावरण असल्याने नॉकटील्युकाचे थवे किनारीकडे सरकतात. आणि मग रात्रीच्या प्रहराला किनारे चमकू लागतात.