कोरोनाच्या संकटानंतर, वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक विभागामध्ये कर्मचाऱ्यांचा जाणवलेला तुटवडा लक्षात घेता, आरोग्य विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भरती करण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले होते. परंतु, ऐनवेळी तांत्रिक अडचणीमुळे आदल्या दिवशी ती परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे हि परीक्षा भविष्यात घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात येऊन सुद्धा अद्याप पर्यंत घेण्यात आलेली नाही. आणि आता राज्यात अनेक ठिकाणी कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येत आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आरोग्य विभागात खाजगीकरणाचा घाट घातला आहे. शासकीय पदे मंजूर असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यासह कोल्हापूर विभागात आता ठेकेदारी पद्धतीने आरोग्य कर्मचार्यांची भरती करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत. तर १९६ पदाची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार असून त्यासाठी वाशी येथील मे. डी. एम. एंटरप्रायझेस या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे रत्नागिरीतील महिला रूग्णालयातील ४९ पदे तीन वर्षाच्या कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार असल्याने शासनाने आरोग्य विभागाचे पूर्णतः खाजगीकरण करण्याचे धोरण अवलंबले आहे का? यापुढे शासकीय नोकरी मिळणारच नाही का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी आरोग्य विभागाने यापूर्वी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात आली. त्या परीक्षेच्या कालावधीत गोंधळ झाल्याने ती परीक्षा रद्द करण्यात आली होती. शासन पुन्हा परीक्षा घेवून भरती प्रक्रिया राबवेल असे असतानाच आता कोल्हापूर विभागाने थेट कर्मचारी भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय जाहीर करत कंत्राटदार कंपनीची नियुक्ती केली आहे.