राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व गावांच्या गावठाणचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील दहा गावांची निवड केली आहे. या प्रकल्पासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील ५१६ गावांचा समावेश असून त्याचे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सर्वेक्षण होणार आहे.
स्वामित्व योजनेंतर्गत भूमी अभिलेख विभागामार्फत रत्नागिरी जिल्ह्यातील ५१६ गावांचे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयामध्ये सर्व भागांमधील इत्यंभूत माहिती असते. मंडणगड तालुक्यात पथदर्शी प्रकल्प राबवला जाणार आहे. ग्रामीण भागातील गावठाणांच्या सीमा निश्चित करून गावातील नदी, ओढे, नाल्यांच्या सीमा तसेच रस्त्यांच्या जागा निश्चित करण्यात येणार आहेत. अनेक वेळा अगदी डोंगर कपारीमध्ये स्थित असणाऱ्या भागाची अचूक नोंद होत नाही. त्यामुळे सरकार दरबारी प्रत्येक गावाची आणि त्यामधील लहानात लहान विभागाची सुद्धा अचूक नोंद असणे गरजेचे असते. त्यामुळे, ड्रोनच्या सहाय्याने या गोष्टी घडणे नक्कीच शक्य होणार आहे.
भूमी अभिलेख विभागाने प्रत्येक तालुक्यातील गावे निश्चित केली आहेत. मात्र मंडणगड, दापोली तालुक्यात सर्वांत जास्त गावे आहेत. शासनाकडून हि सर्व्हेक्षण प्रक्रिया पार पाडण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याची मागणी करण्यात आली असून भूमी अभिलेख विभाग आता प्रत्येक गावाच्या सर्वेक्षणासाठी मिळणाऱ्या तारखांच्या प्रतीक्षेमध्ये आहे.
भूमी अभिलेख विभागाने त्यावर काम सुरु केले असून रत्नागिरी जिल्ह्यातील काही गावांची निवड देखील केली गेली आहे. समुद्रसपाटीपासून गावाची उंची व ठिकाण तसेच अन्य अनुषंगिक मुद्द्यांच्या आधारे तपासणी झाल्यानंतर ड्रोन कॅमेरा सर्वेक्षणासाठी गावांची निवड करण्यात आली आहे.