राज ठाकरे यांनी भोंग्याविरुद्ध हनुमान चालीसा पठण आंदोलन पुकारले आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. तर पोलिसांकडून आंदोलन करणाऱ्यांची धरपकड करण्यात येत आहे. याबाबत राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
९२ टक्के ठिकाणी भोंग्यावरील अजाण बंद झाली आहे. तर काही ठिकाणी ५ वाजायच्या आत लागली. काही ठिकाणी कमी आवाजात झाली. मशिदींवर भोंगे कायमचे थांबले नाही तर हनुमान चालिसा लावली जाणारच, असा स्पष्ट इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा दिला आहे.
रत्नागिरी शहरातील मनसेच्या एका पदाधिकाऱ्याच्या घरात हनुमान चालिसा म्हणण्याचा कार्यक्रम होण्याआधी रत्नागिरी शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. हनुमान चालिसा पठणासाठी जमलेल्या मनसेच्या ६ ते ७ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कार्यक्रमाला अटकाव केला. रत्नागिरी शहरातील थिबा पॅलेस परिसरातील मनसे पदाधिकाऱ्याच्या घरात बुधवारी दुपारी १२ वाजता हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याची माहिती रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांना मिळताच ते कर्मचाऱ्यांसह त्याठिकाणी दाखल झाले. या पदाधिकाऱ्याच्या घराच्या परिसरात मुस्लिम बांधवांचे वास्तव्य असून, कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहचू नये यासाठी पोलिसांनी हनुमान चालिसाचा हा कार्यक्रम रोखला. त्यानंतर पोलिसांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष रुपेश सावंत, अमोल श्रीनाथ यांच्यासह ६ ते ७ जणांना घटनास्थळावरुन अटक करुन पोलीस स्थानकात आणले आहे.