HomeRatnagiriरत्नागिरीत महावितरणची फसवणूक; जुना स्टॅम्प पेपर एडिट करणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल

रत्नागिरीत महावितरणची फसवणूक; जुना स्टॅम्प पेपर एडिट करणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल

नवीन टेंडरसाठी ५०० रुपयांचा जुना स्टॅम्प पेपर पीडीएफ एडिट करून वापरला; मिरजेच्या कंत्राटदाराचा प्रताप उघड.

रत्नागिरी: सरकारी कामांची टेंडर्स मिळवण्यासाठी कंत्राटदार वेगवेगळे मार्ग अवलंबतात, पण रत्नागिरीत एका कंत्राटदाराने केलेली चलाखी थेट पोलिसांच्या कचाट्यात सापडली आहे. नवीन कामाचे टेंडर पदरात पाडून घेण्यासाठी जुन्या कामासाठी वापरलेल्या ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरची थेट ‘पीडीएफ’ (PDF) एडिट करून ती अधिकृत पोर्टलवर जोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महावितरण परिमंडळ कार्यालयाची दिशाभूल व फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित कंत्राटदारावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी कोणावर झाली कारवाई?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल शिवाजी बेले (रा. मिरज, जि. सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित कंत्राटदाराचे नाव आहे. याप्रकरणी महावितरण परिमंडळ कार्यालयाच्या कार्यकारी अभियंता अनुराधा सुरेशराव आंधनंसरे (वय ४५, रा. थिबा पॅलेस रोड, जैन कॉलनी, रत्नागिरी; मूळ रा. नाशिक) यांनी १ सप्टेंबर रोजी अधिकृतरीत्या रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अशी उघडकीस आली चलाखी

हा सर्व प्रकार २७ डिसेंबर २०२५ ते १६ एप्रिल २०२६ या कालावधीत नाचणे (रत्नागिरी) येथील महावितरण परिमंडळ कार्यालयात घडला.

तपासानुसार, संशयित कंत्राटदार अतुल बेले याला यापूर्वी महावितरणचे एक काम मंजूर झाले होते. त्या कामाच्या वेळी त्याने ५०० रुपयांचा अधिकृत स्टॅम्प पेपर वापरला होता. दरम्यान, महावितरणने नवीन कामासाठी पुन्हा निविदा (टेंडर) प्रक्रिया जाहीर केली. या नवीन टेंडरसाठी ‘डिक्लेरेशन बाँड’ सादर करणे अनिवार्य होते.

नवा स्टॅम्प पेपर खरेदी न करता कंत्राटदाराने एका डिजिटल युक्तीचा वापर केला. त्याने जुन्या स्टॅम्प पेपरच्या डिजिटल पीडीएफ फाईलमध्ये संगणकावर बदल (एडिटिंग) केले. त्यानंतर त्याची प्रिंट काढून त्यावर नवीन टेंडरचा मजकूर टाईप केला आणि स्वाक्षरी केली. हा बनावट बाँड खरा असल्याचे भासवून महावितरणच्या अधिकृत ई-निविदा पोर्टलवर अपलोड करण्यात आला.

अधिकाऱ्यांच्या तपासणीत भांडाफोड

टेंडर प्रक्रियेदरम्यान सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची छाननी करत असताना महावितरणच्या अधिकाऱ्यांना संशय आला. बारकाईने तपासणी केली असता, हा स्टॅम्प पेपर आधीच दुसऱ्या कामासाठी वापरण्यात आलेला असून त्यामध्ये डिजिटल फेरफार करण्यात आल्याचे उघडकीस आले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महावितरण प्रशासनाने तात्काळ पोलीस ठाण्याची पायरी चढली. रत्नागिरी शहर पोलिसांनी या प्रकरणी कंत्राटदार अतुल बेले याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेअंतर्गत फसवणूक आणि खोटी कागदपत्रे खरी भासवून सादर केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular