रत्नागिरी तालुक्यामध्ये कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये झालेल्या लक्षणीय संक्रमितांच्या वाढीमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. संक्रमितांसोबत कोरोनामुळे होणार्या मृत्यूंचे प्रमाण देखील वाढल्याने, तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृताना दहन करण्यावरून अनेक ठिकाणी वादजन्य परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे असे तणाव या महामारीमध्ये भविष्यात निर्माण होऊ नयेत म्हणून नगरपालिकेने चर्मालय येथील स्मशानभूमीमध्ये एका बाजूला मोफत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यासाठी गॅस दाहिनीची व्यवस्था करण्यात आली. परंतु, दुसर्या लाटेमध्ये कोरोनामध्ये मृत पावलेल्यांची संख्या अधिक प्रमाणात वाढल्याने सहा लोखंडी स्टँड आणि गॅस दाहिनी देखील कमी पडू लागल्या.
एकावर अंत्यसंस्कार करण्याचा खर्च साधारण ५ ते ६ हजारपर्यंत येतो. रत्नागिरी नगरपालिकेने कोरोना संकटाच्या काळामध्ये सामाजिक बांधिलकीतून केलेले मोफत अंत्यसंस्कारांचे कार्य नक्कीच मोठे आहे. कोरोनापुर्वी ३-४ महिन्याला चर्मालयमध्ये ३ लाखांची लाकडे पुरात होती, परंतु कोरोनाच्या या काळामध्ये १७ लाखांची लाकडे सुद्धा कमी पडू लागली आहेत. स्मशानभूमीचे निर्जंतुकीकरण, मजगाव रोड येथे बांधण्यात आलेल्या कोविड सेंटर मधील डॉक्टरांचा, नर्सचा पगार, औषधांचा खर्च, रुग्णांच्या जेवणाचा खर्चाचा बोजा पूर्णत: नगरपालिकेवर पडत आहे.
रत्नागिरीचे नगराध्यक्ष यांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरपालिका सध्या आर्थिक अडचणीमध्ये असून, कोरोनाच्या महामारीमध्ये सामाजिक बांधिलकीतून बाधितांचा मोफत अंत्यविधी, मजगाव येथील कोविड सेंटरचा खर्च, स्मशानभूमी, कोविड सेंटरचे निर्जंतुकीकरण या सगळ्या गोष्टींचा आर्थिक भार नगरपालिकेवर पडला आहे. शासनाकडून विविध प्रकारे येणारा १७ कोटींचा निधी अद्याप मिळाला नसल्याने नगरपालिकेची अवस्था आर्थिक रित्या नाजूक बनली आहे. शासनाकडून मिळणाऱ्या निधीमधील १७ लाखाचा निधी सुद्धा अजून आलेला नसल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.