सर्व सोशल मिडियावर काळ संध्याकाळी अचानक आज बुधवार २ मार्च रोजी पाणी पुरवठा होणार नाही अशी माहिती रत्नागिरी नगर परिषदेच्यावतीने देण्यात आली आहे. रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणाच्या दुरुस्तीच्या कामानिमित्त बुधवार २ मार्च रोजी पाणी पुरवठा होणार नाही अशी माहिती रत्नागिरी नगर परिषदेच्यावतीने देण्यात आली.
पाणीपुरवठा होणार नसल्याने शहरातील नागरिकांनी जपून पाण्याचा वापर करावा, तसेच नगर परिषदेला सहकार्य करावे असेही आवाहन नगर परिषदेतर्फे करण्यात आले आहे. रत्नागिरी शहराला आज पाणीपुरवठा होऊ शकला नाही मात्र रत्नागिरी नगर परिषदेकडून शिळ धरणांतील कामाच्या दुरुस्तीसाठी हा पुरवठा होणार नसल्याचे काल जाहीर करण्यात आले होते.
मात्र या सर्वाला नगरपरिषदेचा व पुलाच्या कामासाठी असलेला कंत्राटदाराचा कारभार जबाबदार असल्याचे आता समोर आले आहे. उन्हाळ्याला हळू हळू सुरुवात व्हायला लागली आहे. उष्मा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे अचानक आदल्या दिवशी संध्याकाळी पालिकेने असे जाहीर केल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
पाण्याची ही पाईपलाईन ज्या मार्गावरून येते, त्या पाटील वाडीजवळील लहान पुलाचे डागडुजीचे काम सध्या सुरू आहे, आणि त्याच पुलाजवळून हि पाणी योजनेची पाइपलाइन गेली आहे. सदर पुलाचे काम सुरू असताना त्याठिकाणी असलेल्या पोकलेनच्या कामामध्ये ही पाईपलाईन तुटली, आणि त्यामुळेच रत्नागिरी शहरातील पाणीपुरवठा खंडित झाला आहे. अशाप्रकारे काम चालू असताना कंत्राटदार व नगरपरिषदेची कोणतेही देखरेख व नियंत्रण नसल्याने रत्नागिरीकरांना आज मात्र पाण्यापासून वंचित रहावे लागले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये अशा कामाच्या वेळी तिथे कोणीतरी निरीक्षक नेमावा अशी मागणी केली जात आहे.