रत्नागिरी तालूक्यातील क्षेत्र नाणीजधाम येथे मुसळधार पावसाच्या साक्षीने गुरुपौर्णिमेचा सोहळा उत्साहात पार पडला. अनेक ठिकाणाहून गुरूंच्या दर्शनासाठी उपस्थित लाखो भाविकांनी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या समोर सुंदरगडावर जागा मिळेल तिथे बसून गुरुपूजन केले. सकाळपासून धुवाधार पाऊस सुरु आहे, तरीही काल रात्रीपर्यंत भाविक सुंदरगडावर पोहोचतच होते. अगदी पहाटेपर्यंत खासगी वाहने, एस.टी, रेल्वे अशा मिळेल त्या वाहनांने भाविक गटागटाने दाखल होत होते. जवळ राहणारे भाविक सकाळी सुंदरगडावर पोहोचले. आणि बघता बघता संपूर्ण सुंदरगड भाविकांनी फुलून गेला.
यावेळी आशीर्वाद देताना जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज म्हणाले,‘‘ गुरुपौर्णिमा म्हणजे वैदिक सनातन संस्कृतीतील फार मोठी अनमोल भेट आहे. हा वैदिक सनातन धर्म ऋणानुबंध जोपासणारा आहे. या धर्माची मूल्ये आकाशाला गवसणी घालणारी व विश्वबंधुत्व जोपासणारी आहेत. गुरूंच्या ठाई, त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वर्षातून येणार दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय.’’
दिवसभर पाऊस सुरू होता. मात्र त्याची तमा न बाळगता भाविक येत होते. सोहळ्यात सहभागी होत होते. सुंदरगड व नाथांचे माहेर अशा सर्व मंदिरांत भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती. चरणदर्शनासाठीही रांगा होत्या. रात्री दक्षिणपीठाचे उत्तराधिकारी प.पू. कानिफनाथ महाराज व त्यानंतर जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे अमृतमय प्रवचन झाले. त्यांनी सद्गुरू कसा असतो, त्याचे व भक्तांचे नाते कसे असते, त्यांच्या प्रवचनानंतर रात्री वारी उत्सवाची सांगता झाली.
दुपारी महामार्गावरील अपघातग‘स्तासाठी आणखी दहा रुग्णवाहिकांचे लोकार्पण झाले. दक्षिणपीठाचे उत्ताराधिकारी प.पू. कानिफनाथ महाराज व संस्थानचे विश्वस्त यांच्या उपस्थितीत व हस्ते हा सोहळा झाला. रुग्णवाहिका सेवा ही संस्थानची एक महत्वाची लोकसेवा आहे.