जिल्ह्यात जल्लोषात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून जिल्ह्यात १२० ठिकाणी सार्वजनिक तर ३२ ठिकाणी खाजगी दुर्गा मातेची प्रतिष्ठापना झाली आहे. दुर्गामातेचे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात रात जागर सुरू झाला असून दांडिया, गरबा यांसह विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे यानिमित्त जिल्ह्यात सार्वजनिक मंडळातर्फे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा पोलिस प्रशासनाने देखील महिलांच्या संरक्षणासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखल्या आहेत. घटस्थापनेपासून विधिवत नवरात्र उत्सवाला सुरुवात होते. यानिमित्त अनेक सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळे, तसेच विविध मंदीरे तसेच खाजगी घरांमध्ये देखील दुर्गा देवीची स्थापना केली आहे.
नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत रत्नागिरी आगाराने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भाविकांसाठी विशेष योजना आणत खास भेट दिली आहे. रत्नागिरी आगाराच्या वतीने २७ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान दुर्गामाता दर्शनासाठी विशेष बससेवा सुरु करण्यात येणार आहे. भाविकांना आता रत्नागिरी आणि राजापूरातील दुर्गामातेचे दर्शन करणे सोपे होणार आहे. नवरात्रौत्सवात एसटीमुळे आता एकाच दिवशी १० ठिकाणी दुर्गामातेचे दर्शन घेता येने शक्य होणार आहे.
या १० ठिकाणांमध्ये पावस येथील नवलाईदेवी, कशेळी येथील जाकादेवी, आडिवरे येथील महाकाली, वेत्ये येथील महालक्ष्मी, भालावली येथील आर्यादुर्गादेवी, रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ल्यावरील भगवती, जुगाईदेवी, शिरगाव येथील आदिष्टी, खेडशी येथील महालक्ष्मी, नाचणे येथील नाचणादेवीचे दर्शन घेता येणार आहे. याकरीता ३०५ रुपये प्रति व्यक्ती प्रवासभाडे आकारले जाणार आहे. अधिक माहितीसाठी दोन संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. आगार व्यवस्थापक संदिप पाटील, मोबाईल ७५८८१९३७७४ ,स्थानक प्रमुख भाग्यश्री प्रभुणे, मोबाईल ९८५०८९८३२७ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तरी या सुविधेचा लाभ महिलानी घ्यावा.