तालुक्यातील निरुळ येथील चिरेखाणीवर अज्ञात कारणातून एकाच कुटुंबातील ४ जणांना शिवीगाळ करत हातांनी तसेच लोखंडी रॉडने मारहाण केली. याप्रकरणी तिघांविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुंड्या खिल्लारी, युवराज जाधव, अप्पू खिल्लारी सर्व रा.निरुळ फाटा,रत्नागिरी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात निवास विद्याधर मलमे वय ४०, रा.निरुळ धोपटवाडी,रत्नागिरी यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार,निवास मलमे हा संतोष साळवी यांच्या चिरेखाणी शेजारी झोपडीत राहून खाणीवरच मॅनेजर म्हणून काम करतो.
सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास गुंड्या खिल्लारी आणि युवराज जाधव या दोघांनी तिथे येऊन इथला मॅनेजर कोण असे विचारले. तेव्हा मीच इथे मॅनेजर असल्याचे निवासने सांगितले. त्यावर दोघांनीही त्याला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच गुंड्याने अप्पू खिल्लारीलाही बोलावून घेउन तिघांनीही निवास आणि त्याची पत्नी विलासनी, मुलगी निकिता आणि निलम या चौघांनाही शिवीगाळ करत जबर मारहाण केली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस हवालदार चव्हाण करत आहेत.
मारहाणीचे कारण काहीच कळून न आल्याने, आणि अचानक झालेल्या मारहाणीने सर्व कुटुंबीय हादरून गेले. जिल्ह्यात हल्ली मारहाणीची प्रकरणे वाढत चालली आहेत. पोलीस यंत्रणा देखील या बद्दल सतर्क झाली आहे. जुन्या पुराण्या वादातून अनेक भानगडी होताना दिसत असून, त्याचे रुपांतर मारहाणीमध्ये होत आहे. काही वेळा अशी प्रकरणे गंभीर स्वरूप घेत आहेत. इतकी कि, काही वेळा एखाद्याला जीव सुद्धा गमवावा लागत आहे.