रत्नागिरीमध्ये काही महिन्यांपासून ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वारंवार घडताना दिसत आहेत. अनेक वेळा लहान, तरुण, आणि वृद्ध यांना हेरून अशा प्रकारची फसवणूक केली जात असल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या खरेदी विक्रीसाठी सगळीजण ऑनलाईन पद्धतीचा अधिक अवलंब करत असल्याने , त्याबाबतचे धोके देखील जाणून घेणे गरजेचे आहे.
रत्नागिरीमधील एकाने दुचाकी विकायच्या बहाण्याने तरुणाकडून वेळोवेळी असे एकूण ४० हजार रुपये ऑनलाईन घेतले आणि प्रत्यक्षात मात्र त्याला दुचाकी न देता त्याची सफसेल फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी एकाच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हंसराज हनुमंत कदम असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात आदित्य वामन कळंबटे वय २१, रा.झरेवाडी हातखंबा, रत्नागिरी यांनी तक्रार दिली आहे.
त्यानुसार, हंसराज कदमने, आदित्य कळंबटे यांना फोन करून होंडा शाईन दुचाकी विकायची असल्याचे सांगितले. तसेच डिलिव्हरी चार्जेस म्हणून प्रथम १५५० रुपये भरण्यास सांगून उर्वरित रक्कम वेळोवेळी मागितली. समोरच्या कदम नामक व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन, आदित्यच्या भावाने एकूण ४० हजार रुपये गुगल द्वारे संबंधित कदमला पाठवले.
परंतु एकूण ४० जहाराची रक्कम दिल्यावर देखील गाडीबाबत विचारणा केली असता, कदमने उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे काहीतरी काळबेर असल्याचे लक्षात यायला कळंबटेला वेळ लागला नाही. आणि अशा प्रकारे त्याची हजारो रुपयांची फसवणूक झाल्याने तातडीने त्याने रत्नागिरी पोलीस स्थानकात संबंधित कदमच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस तपास पुढे सुरु आहे.

