रत्नागिरी तालुक्यातील निरूळ येथील सुरेश दत्ताराम रसाळ वय ६५ हे मुंबई भाईंदर येथून रेल्वेने प्रवास करत असताना रत्नागिरी रेल्वेस्टेशन ते पावस दरम्यान तिघा अज्ञातांनी त्यांच्याकडून २ लाख ६६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरली होती. त्यातील दोघा आरोपींना गुजरातमधून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली.
महंमद आरिफ अन्सारी वय ३५, रा. कडी, ता. जिल्हा मेहसाणा, रफिक वासुद्दीन अन्सारी वय ४२, गुजरात अशी संशयितांची नावे आहेत. त्यांना इस्लामपूर पोलिसांनी गुजरातमधून ताब्यात घेतले. १८ ऑक्टोबरला सायंकाळी ७ ते ७.४५ या दरम्यान रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे रसाळ उतरले असता तुम्हाला कुठे जायचे आहे, असे या संशयितांनी त्यांना विचारले तेव्हा त्यांनी निरूळ येथे जायचे आहे, असे सांगितल्यावर मोटारीतील या माणसाने आम्हीही तिकडे चाललो आहोत. तुम्हाला जाताना सोडतो, असे सांगितले.
त्यांच्यावर विश्वास ठेवून रसाळ गाडीत बसले व आपल्या बॅगा डिक्कीमध्ये ठेवल्या. प्रवासा दरम्यान मागे बसलेल्या दोन अज्ञात तरूणांनी त्या बॅगेतील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. पावसला आल्यानंतर आमचे इथे काम आहे. त्यामुळे आम्ही तुमच्या गावापर्यंत येवू शकत नाही, असे सांगून त्यांना उतरवले. रसाळ यांना लुबाडल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यामध्ये १९ ऑक्टोबरला तक्रार दाखल केली. तेंव्हापासून पोलीस यंत्रणा त्यांच्या मागावरच होती. अखेर गुप्त माहितीमधून मिळालेल्या माहितीमुळे त्यांचा सुगावा लागला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.