रत्नागिरीसह अनेक जिल्ह्यामध्ये गुन्हेगार पकडण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची भूमिका सध्याच्या काळात जास्त महत्वाची ठरत आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुन्ह्यांची आणि गुन्हेगारांची उकल लवकर व्हावी यासाठी ८३० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे कंट्रोल रूममधून पोलीस यंत्रणा संपूर्ण जिल्ह्यावर लक्ष ठेवू आहे. तसेच विविध प्रकारचे गुन्हे जसे महिलांची छेड, दुचाकीवरून दागिने लुटणे, पर्स लांबवणे, एखाद्यावर हल्ला करणे इत्यादी प्रकारचे गुन्हे घडत असताना तत्काळ मदत पाठविणे, किंवा गुन्हेगारावर लक्ष ठेवणे या सर्व गोष्टी सीसीटीव्ही लावल्यामुळे शक्य होत आहेत.
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच गुन्हयांचा लवकर शोध लागावा आणि आरोपी पकडले जावे यासाठी सीसीटीव्ही कॅमेर्याची यंत्रणा जिल्हयात कार्यान्वित करण्यासाठी पोलीसांनी पुढाकार घेतला आहे. मात्र देशाचे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आणखी ७५० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत, असे जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांची नजर आता सीसीटीव्हीच्या माध्यमातून जिल्हयाभर राहणार आहे.
चिपळूण येथील पत्रकार परिषदेत त्यांनी याविषयी माहिती दिली. जिल्हयातील पोलीस दल एक कार्यक्षम पोलीस दल असून गेल्यावर्षी सुमारे ८० टक्के गुन्हे उघडकीस आणून आरोपींना जेरबंद करण्याची कामगिरी पोलिस दलाने केली आहे. त्यामुळे अजून सक्षमपणे काम करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेर्याची यंत्रणा आवश्यक आहे असे पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग म्हणाले.
पुढे ते म्हणाले, आपल्या जिल्हयात संस्था तसेच व्यापारी, पोलीस ठाणे आणि नागरिकांनी देखील पुढाकार घेवून सुरक्षेच्या दृष्टीने ८३० कॅमेरे बसवले आहेत. या सर्वांची नोंद घेण्यात आली आहे, परंतु ते कॅमेरे कार्यरत आहेत किंवा कसे याबाबत देखील माहिती घेतली जात आहे असेही म्हणाले.