रत्नागिरी जिल्ह्यात गावोगावी असलेल्या पोस्टाचा कारभार गतिमान व्हावा व गावा गावात लोकांना उत्तम दर्जाची पोस्टाची सेवा मिळावी या हेतूने मुख्य पोस्टाच्या कार्यालयासोबत प्रत्येक गावात शाखा कार्यालये चालू झाली. गतिमानतेला प्राधान्य देत प्रत्येक छोटी छोटी मशिनरी देऊन ऑनलाइन व्यवहारही सुरू करण्यात आला आहे. पण यंत्रणा योग्य पद्धतीने चालवण्यास रत्नागिरी जिल्हा अपयशी ठरल्याचे चित्र दिसून आले आहे. काही ठिकाणी वीज आहे तर नेट नाहीची बोंब आहे.
अर्धा महिना उलटून गेला तरी जिल्ह्यातील ८०% पोस्टाची मुख्य कार्यालय व शाखा कार्यालयालातील कामे बंद असल्याचे समजते. मुख्य व शाखा कार्यालये सर्व्हरला जोडली गेली असल्याने, इंटरनेट अभावी ऑनलाईन व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांना व्यवहार होत नसल्याने रोजचा आर्थिक कारभार चालवणे जिकिरीचे झाले आहे. शिवाय पोस्टावरच ज्या ग्राहकांचे अवलंबून आहे, त्यांची तर चांगलीच कोंडी झाली आहे.
आडगावात अनेक वयोवृद्ध ग्राहक गावातल्या पोस्टाच्या व्यवहारावर अवलंबून असतात. अशा ग्राहकांना पोस्टातून पैसे मिळत नसल्याने दैनंदिन औषधपाण्यासह इतर खर्च भागवणे जिकरीचे झाले आहे. संजय गांधी निराधार योजनांसारख्या अनेक शासकीय योजनांचे पैसे पोस्ट खात्यावर जमा होतात अशा वयोवृद्ध ग्राहकांना वारंवार पोस्टाच्या खेपा मारून परत जावे लागत आहे.
जिल्ह्यात बीएसएनएल च्या नेटवर्क वर अवलंबून असलेली २०% कार्यालये सुरू असून बाकीच्या सगळ्या मुख्य व शाखा कार्यालयांचे व्यवहार बंद पडले आहेत. २० ऑक्टोबर पासून बंद असलेल्या या पोस्टाच्या सेवेबाबत, ग्राहकांनी पोस्टाच्या विविध अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर, आज होईल, उद्या होईल अशी थातूरमातूर उत्तरे ऐकायला मिळाली असल्याचे ग्राहकाचे म्हणणे आहे.
अद्याप परिस्थिती जैसे थेच असल्याने, ग्राहकांना दिवाळी देखील पोस्टाच्या (अव)कृपेने बिनापैशाचीच साजरी करावी लागल्याचे चित्र समोर दिसत आहे. ज्यांच्या भोंगळ कारभारामुळे व दुर्लक्षामुळे ही परिस्थिती अनेक दिवस जैसे थे राहिली त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.