रत्नागिरी शहरी भागामध्ये तीन दिवस चाललेल्या प्रमोद महाजन क्रीडांगणावर कृषी महोत्सवाला आगामी वर्षी पर्यटन महोत्सवाची जोड द्या व राज्यातील सर्वोत्तम महोत्सव पूर्वनियोजनात करा, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. तीन दिवसीय महोत्सव व पशुपक्षी प्रदर्शनाच्या सांगता सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे, पशुसंवर्धनचे धनंजय जगदाळे, बाबू म्हाप आदी उपस्थित होते.
पुढील वर्षी ०१ मे महाराष्ट्र दिनी रोजी याची सुरुवात होईल असे नियोजन करा, असे सामंत यावेळी म्हणाले. कृषी व पर्यटन महोत्सव सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरेल असेही त्यांनी सांगितले. या महोत्सवात १२० स्टॉलधारक तसेच पशूपक्षी प्रदर्शनात राज्याच्या सर्व भागातील पशूपालक सहभागी झाले होते. यातील विजेत्यांना पुरस्कार व स्मृतीचिन्ह देवून त्यांचा सन्मान अतिथींच्या हस्ते गौरवण्यात आले.
प्रमोद महाजन क्रीडांगणावर पशुपक्षी प्रदर्शनाला देखील गुरूवारपासून शुभारंभ झाला. यामध्ये विविध प्रकारचे पशू व पक्षी ठेवले आहेत. खिल्लारी जातीच्या बैलजोड्या, मेहसाण जातीच्या म्हैशी, टर्की जातीचे पक्षी, फायटर कोंबडा, राजहंस, मिली जातीची कोंबडी, शाही जातीचा बकरा, कोवेरो कोंबड्या पहायला ठेवल्या होत्या.
सोमेश्वर येथील शाहीद हुशये यांनी पशू विभागाच्या सूचनांनुसार बोकडाचे योग्य संगोपन केले. नियमित आणि पोषक खाद्य दिले तर हैद्राबादी जातीच्या बोकडातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवता येवू शकते, हे दाखवून दिले आहे. दोन वर्षे चांगली पाळणूक केलेल्या हैद्राबादी बोकडाची किंमत एक लाख रुपये इतकी आहे. हा बोकड रत्नागिरीत आयोजित रत्न कृषि महोत्सव व पशुपक्षी प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरला आहे.