शहरातील खड्डेमय रस्ते, अनियमित पाणीपुरवठा, गटारांची खराब स्थिती, आरोग्यव्यवस्थेचे तीनतेरा आणि भटक्या कुत्र्यांची वाढती समस्या यामुळे रत्नागिरीकर त्रस्त झाले आहेत. या सर्व समस्या घेऊन जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि भाजपचे माजी नगराध्यक्ष अशोक उर्फ मामा मयेकर यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरले. शहराच्या दुरवस्थेबाबत भाजपने जाब विचारला आणि त्यावर त्वरित उपाययोजना करण्यास सांगितली. मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या दालनात भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते पोहोचले. माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर यांनी पालिकेच्या सर्व कारभाराची पोलखोल केली. सध्या शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सर्व रस्त्यांवर खड्डे आहेत. हे खड्डे कधी बुजवणार? पावसाळी डांबर कुठे आहे? डबर टाकून रस्ते खराबच होत आहेत. पावसामुळे पाणी साचून खड्डा कुठे आहे ते कळत नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे काम होत नसल्याचे दिसून येत आहे. साळवी स्टॉप येथील डम्पिग ग्राऊंडवर अस्वच्छता, दुर्गंधीमुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या ठिकाणी नियमित साफसफाई, कचरा व्यवस्थापन व निर्जंतुकीकरणाची तातडीने व्यवस्था झाली पाहिजे, अशी मागणी या वेळी भाजपातर्फे करण्यात आली. असहाय, मोकाट गुरे पकडली जात नाहीत. ती फक्त हाकवली जात आहेत. गुरांमुळे रस्त्यात अपघात होत आहेत तसेच शहरातील काँक्रिटीकरणाचे काम रखडले आहे. अशा अनेक मुद्द्यांवर भाजपाने जाब विचारला. मोकाट कुत्रे व अस्वच्छ गटारांच्या दुरुस्तीसाठी तातडीने पावले उचला. ही कामे करताना नगरपालिकेचे कर्मचारी दिसू देत, असे मयेकरांनी ठणकावून सांगितले. या वेळी माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, भाजपा शहराध्यक्ष दादा ढेकणे, माजी नगरसेवक राजेश तोडणकर, समीर तिवरेकर, मुन्ना चवंडे, प्रणाली रायकर, मानसी करमरकर, सुप्रिया रसाळ, माजी शहराध्यक्ष राजन फाळके, मंदार मयेकर, मंदार खंडकर, नीलेश आखाडे, शैलेश बेर्डे, सचिन करमरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपच्या प्रमुख मागण्या – शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची डागडुजी व डांबरीकरण तातडीने करावे. पाणीपुरवठा नियमित व शेड्युलनुसार सुरळीत करावा. गटारलाईनची स्वच्छता व देखभाल नियमित करावी. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात. सार्वजनिक आरोग्यव्यवस्था सक्षमपणे राबवावी.
समस्यांचा पाढा – शहरातील एका बाजूच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण झाले आहे. दुसऱ्या बाजूचे कधी पूर्ण होणार, असा सवाल उपस्थित करण्यात आला. शहरात काही ठिकाणी धूरफवारणी होत नाही त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे तसेच नगरपालिकेवर प्रशासक आल्यापासून अनेक लोक रस्त्यावर कचरा टाकू लागले आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई व्हायला हवी तसेच जनजागृतीसाठी बॅनर लावले पाहिजेत. ते पालिकेकडून होत नसल्याचे सांगण्यात आले. नवीन नळपाणी योजना पालिकेने ताब्यात घेतली आहे का? कारण, जयस्तंभ ते तेलीआळी नाका तसेच एसटी स्टँड, राममंदिरसमोरील रस्त्यावर आतापर्यंत पाईप फुटले आहेत. याला जबाबदार कोण? असा सवालही भाजपने विचारला.