रत्नागिरी तालुक्यातील फिनोलेक्स कंपनी आणि मुकुल माधव फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक मुठ्ठी अनाज उपक्रमांतर्गत मतिमंद मुलांसाठीच्या आशादीप संस्थेला आवश्यक असलेले धान्य देणगी स्वरूपात देण्यात आले. दिवाळीच्या निमित्ताने आणि इतरवेळी देखील या कंपनी आवश्यक असणाऱ्या अनेक अशा प्रकारच्या संस्थाना सढळ हस्ते मदत करत असते.
सन २०१६ पासून या एक मुठ्ठी अनाज या उपक्रमाची सुरूवात मुकुल माधव विद्यालयाच्या गोळप, रत्नागिरी येथून झाली. या उपक्रमाद्वारे विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक मूठ धान्य आणण्याचे आवाहन करण्यात येते. आणि लहानापासून ते मोठ्या पर्यंत मुठीप्रमाणे जमा करण्यात येणारे धान्याचे अनेक किलोमध्ये रूपांतर होते. विद्यार्थ्यांनी भरभरून दिलेले हे धान्य रत्नागिरीतील मतिमंद मुलांसाठी कार्यरत असलेल्या आशादीप या संस्थेला देणगी स्वरूपात देण्यात आले.
तेव्हापासून दरवर्षी हा उपक्रम नित्यनियमाने सुरु ठेवण्यात येत आहे. परंतु कोविड-१९ च्या आपत्ती काळामध्ये शाळाच बंद ठेवण्यात आल्यामुळे हा उपक्रम खंडीत झाला होता. यावर्षी या उपक्रमाला पुनर्जीवित करण्याची प्रेरणा मुकुल माधव फाऊंडेशनच्या विश्वस्त सौ. रितू प्रकाश छाब्रिया यांनी दिली.
मुकुल माधव विद्यालयामधून सुमारे १५० किलो धान्य गोळा करण्यात आले. हा उपक्रम येथे सिमित न राहता पुढे जावून फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या कर्मचारी, त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचला. त्यांनी देखील या उपक्रमामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या गोळप, झाडगाव येथील कर्मचारी वसाहतीमधून, कंपनीतील कर्मचार्यांकडून एकूण १५० किलो धान्य जमविण्यात आले. दोन्ही संस्थांमध्ये एकूण ३०० किलो धान्य जमा केले आहे.
मुकुल माधव फाऊंडेशन, फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीतील आशादीप मतिमंद मुलांचे वसतीगृह, आनंदी अनुसया वृद्धाश्रम पावस, पावस विद्यामंदिर येथील मुलांचे वसतिगृह, गुरूकुल कोळंबे संगमेश्वर वसतिगृह, रेणुका माता नागालँड वसतिगृह चिपळूण, रत्नागिरी रिमांड होम या संस्थांना दर महिन्याला किराणा स्वरूपात मदत केली जाते. उपक्रमातून जमा झालेले ३०० किलो धान्य प्रत्येकी ५० किलो याप्रमाणे या सहा संस्थांना वितरित करण्यात येणार आहे.