लोकसभेचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपचाच आहे. तो भाजपच लढविणार पक्ष देईल तोच उमेदवार निवडून आणला जाईल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री व भाजप नेते नारायण राणे यांनी आज येथे दिली. सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित कार्यक्रमावेळी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर ते बोलत होते. हा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेना शिंदे गटाला मिळणार की भाजपला यावरून सध्या राजकीय चढाओढ आहे. सुरू त्या पार्श्वभूमीवर श्री. राणे यांचे वक्तव्य महत्त्वपूर्ण जात आहे.
शिंदे गट आणि भाजप यांची लोकसभेसाठी युती असणार हे उघड आहे. पूर्वीच्या युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. सध्या येथील खासदार विनायक राऊत शिवसेनेच्या ठाकरे गटामध्ये आहेत. नव्याने झालेल्या भाजप-शिंदे गट युतीत दोघांनीही या जागेवर दावा केला आहे. शिंदे गटाकडून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची नावे चर्चेत आहेत. केसरकर यांनी अप्रत्यक्षरित्या इच्छुक असल्याचे संकेत दिले आहेत.