एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मुख्य मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यभर काम बंद आंदोलन सुरू आहे. कामगारांचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी प्रशासन दबावतंत्राचा अवलंब करीत असले तरी, कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. पण, एसटी सेवा बंद असल्याने महामंडळाला तब्बल २७९ कोटींचे नुकसान झाले आहे.
राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे २७ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला तब्बल २७९ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. राज्यातील काही बसेस सध्या संथ गतीने सुरू आहेत. त्यातच मुंबईतील आझाद मैदानावर अनेक कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडून आहेत.
आतापर्यंत राज्य शासनाने शेकडो कामगारांना निलंबित केलं आहे. मात्र, कामगार संघटना आपल्या निर्णयावर अजूनही ठाम आहेत. दरम्यान, एसटी कर्मचारी संपाच्या शिष्टमंडळाने परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेतली. त्यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली. सर्व मुद्यांवरही चर्चा करायला तयार आहे, मात्र संप मागे घ्यावा. चर्चा करुया, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे.
एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावं या मागणीसाठी गेले तीन आठवडे एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. आपल्या मागणीवर एसटी कर्मचारी ठाम राहिल्याने जिल्ह्यातील एसटी वाहतूक ठप्प झाली आहे. रत्नागिरी विभागातील एकूण ४१७१ कर्मचाऱ्यांपैकी १३१ कर्मचारी सेवेत रुजू झाले आहेत.आधीच कोरोनामुळे आणि ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर पुकारलेल्या बेमुदत संपामुळे रत्नागिरी विभागाचे सुद्धा मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेला त्याचा फटका बसत असून, एसटीवर अवलंबून असणारे छोटे व्यावसायिक देखील अडचणीत आले आहेत.
एसटी प्रशासनाकडून सातत्याने कर्मचाऱ्यांना ताबडतोब संप मिटवून, कामावर रुजू होण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, संपकरी कर्मचारी निर्णयावर ठाम राहिल्याने प्रशासन त्यांच्यापुढे हतबल झाले आहे. दरम्यान, आतपर्यंत ८९ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ३१ जणांवर सेवासमाप्तीची देखील कारवाई करण्यात आली आहे. राजापूर डेपोत काही प्रमाणात बस वाहतूक सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.