रत्नागिरीसह संपूर्ण राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरूच आहे. त्यामुळे महामंडळाने एसटी व्यवस्था सुरळीत होण्यासाठी निवृत्त चालक तसेच कंत्राटी चालकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार रत्नागिरीत ५० कंत्राटी चालक दाखल झाले असून, आठवडाभरात शहरी भागासह ग्रामीण भागातील अनेक फेर्या सुरू होतील, अशी माहिती रत्नागिरी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ५० कंत्राटी कामगारांच्या नियुक्तीची ऑर्डर काढण्यात आली आहे. हे कर्मचारी सोमवारपासून हजर झाले असून, त्यांची वैद्यकीय तपासणी प्रक्रिया सुरू आहे. सध्या जिल्ह्यात केवळ १० टक्के एसटी वाहतूक सुरू आहे. सोमवारी ५४२ कर्मचारी कामावर हजर होते. यामध्ये चालक ९०, वाहक ७४ आणि चालक तथा वाहक ७० कर्मचार्यांचा समावेश आहे.
त्यांच्या माध्यमातून दिवसभरात एकूण १०७ बसगाड्यांच्या माध्यमातून ५०० फेर्या होत असून, नवीन खासगी ५० चालक हजर झाल्याने दिवसभरात आणखी फेर्या वाढवण्यात येणार आहेत. रत्नागिरी आणि गुहागर या दोन तालुक्यांमध्ये केवळ ३ ते ४% एसटी वाहतूक सुरू असल्याने या भागातील प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
ग्रामीण भागातून शहरी भागात काही कामासाठी यायचं म्हटल तरी, ग्रामस्थांसाठी एसटी चाच मोठा आधार आहे. नाहीतर मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागतो. ग्रामीण भागातील जनतेचाच विचार करून एसटी महामंडळाने लवकरात लवकर सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे लवकरच एसटीची सेवा पुन्हा कार्यान्वित होणार असल्याने, जनसामान्यांना एक प्रकारचा दिलासा मिळणार आहे.