रत्नागिरी शहर परिसरातील, टिळकआळी येथील दुकानाच्या ड्रॉव्हरमधून भरदिवसा अज्ञाताने १८ हजाराची रोकड लांबवल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना बुधवारी ता. २८ दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली आहे; मात्र सीसीटीव्हीमध्ये चोरट्याची ही कृती कैद झाली आहे. त्यामुळे लवकरच चोरटा पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याबाबत दुकान मालक गणेश अशोक रानडे वय ४०, रा. विश्वेश्वर अपार्टमेंट, टिळक आळी, रत्नागिरी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. टिळकआळी येथील विक्रम प्रसाद आर्केडमध्ये श्रीरंग एंटरप्रायजेस नावाचे जनरल स्टोअर आहे. बुधवारी दुपारी पांढऱ्या रंगाचा हाफ शर्ट व पांढऱ्या रंगाची फूल पॅन्ट, कोरीव दाढी असलेला एक तरुण त्यांच्या दुकानात आला होता. चोरट्याने कोणाचेही लक्ष नाही, असे पाहून त्यांच्या दुकानातील काउंटरच्या ड्रॉव्हरमधून १८ हजार रुपयाची रोकड चोरून नेली.
काहीवेळाने ही बाब दुकान मालक रानडे यांच्या लक्षात येताच त्यांनी दुकानाबाहेर आणि आजुबाजूला त्या तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु तो कुठेही सापडला नाही. अखेर त्यांनी शहर पोलिस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत; परंतु चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांना सोपे जाणार आहे.
रत्नागिरीमध्ये अशा प्रकारच्या चोऱ्यांच्या संख्येचे प्रमाण कमी झाले होते. परंतु, अचानक आणि तेही दिवसाढवळ्या चोरी झाल्याने, पुन्हा अशा भुरट्या चोरांनी डोके वर काढले असल्याचे दिसून आले आहे. पोलीस तपास सुरु असून, लवकरच आरोपीला पोलीस ताब्यात घेतील.