कोकण आणि रत्नागीरी कायमच विविधतेने नटलेली आहे. अनेक प्रकारची विविधता येथे पाहायला मिळते. त्यामुळे रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत असतात. परंतु, काही वेळा पर्यटकांना अपेक्षित असलेल्या अनेक सुविधा इथे उपलब्ध नसतात, आणि त्याबद्दल नाराजगी व्यक्त केली जाते.
पर्यटन क्षेत्रामध्ये विकास होण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पर्यटन आराखडा संदर्भात प्राथमिक बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी यावेळी पर्यटन क्षेत्रात काम करणारे व्यक्ती तसेच संस्थेंच्या प्रतिनिधींशी ऑनलाईन संवाद साधला असून, पर्यटन क्षेत्रामध्ये कार्यरत असताना कोणकोणत्या अडचणीचा विशेष करून सामना करावा लागतो, हे जाणून घेतले.
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे आयोजित जिल्हा पर्यटन आढावा बैठकीत बोलताना ते म्हणाले, रत्नागिरी जिल्हामध्ये चांगल्या प्रकारच पर्यटन क्षेत्र विकसीत करण्यासाठी मोठया प्रमाणावर वाव आहे. त्यामुळे जिल्हा पर्यटन दृष्टया विकसीत करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रीत येऊन कार्य करणे आवश्यक असल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी पाटील यांनी केले आहे. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा परिषदेच्या सीईओ डॉ. इंदूराणी जाखड, उपजिल्हाधिकारी अमिता तळेकर, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळये आदि संबधित अधिकारी तसेच दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्रात कार्यरत असणारे अनेक मान्यवर तसेच संस्थांचे प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.
पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्यांशी चर्चा करताना जिल्हाधिकारी म्हणाले कि, प्रत्येकाने पर्यटनाच्या दृष्टीने आपल्या भागातील क्षेत्राचा ॲक्शन प्लॅन तयार करुन त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी सादर कराव्यात जेणेकरुन, पर्यटन आराखडा तयार करण्यासाठी त्या गोष्टींवर विचार करून तो कृतीत आणता येईल. त्याचप्रमाणे या क्षेत्राशी संबंधित लागणाऱ्या परवानगी संदर्भात येणाऱ्या अडचणी देखील दूर करण्यात येतील आणि आपल्याला लवकरात लवकर पर्यटनांशी संलग्न अशा परवानग्या देण्यास शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले.