पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत १७ सप्टेंबरला चित्ते सोडणार आहेत. भारतात ७२ वर्षांनी चित्त्याचे पुनरागमन होणार असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्व आहे. १९५२ ला चित्ता भारतातून नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले होते. आज जगातील फक्त १७ देशांमध्ये चित्ता आढळून येतो. रत्नागिरी मधील पटवर्धन हायस्कूलमध्ये विजू नाटेकर ज्युनिअर कॉलजेमध्ये परिक्षेत्र वनाधिकारी आणि सामाजिक वनीकरण अधिकारी प्रियंका लगड यांनी चित्त्यांबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्वोच्च न्यायालयाने २८ जानेवारी २०२० ला आफ्रिकेतून चित्ते भारतात आणण्याची परवानगी दिली होती, अशी माहिती प्रियंका लगड यांनी या वेळी विद्यार्थ्यांना दिली.
भारतात ७२ वर्षांनी चित्त्यांचे पुनरागमन होणार आहे. मध्यप्रदेशामधील कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये नामिबिया देशातून ३ चित्ते भारतात आणले जाणार आहेत. याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देऊन त्याची जनजागृतीचा कार्यक्रम झाला. चित्ता हा जमिनीवरील सर्वांत वेगवान प्राणी असून तो ताशी ७० मैल म्हणजेच ११३ किमी वेगाने धावू शकतो. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर अंतर्गत नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींची रेड लिस्ट प्रसिद्ध होते. या लिस्टमध्ये चित्त्यांचा समावेश असुरक्षित प्रजाती म्हणून करण्यात आला आहे. जगभरात फक्त सात हजार चित्तेच शिल्लक असल्याचं या यादीमध्ये नमूद करण्यात आलं आहे. या जनजागृतीपर कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना चित्ता प्राण्याचे महत्व सांगून त्याचा आवाजदेखील विद्यार्थ्यांना ऐकवण्यात आला.
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने २०२० मध्ये या प्राण्यांना ‘काळजीपूर्वक निवडलेल्या ठिकाणी’ पुन्हा आणले जाऊ शकते, असा निर्वाळा दिल्यानंतर अधिकाऱ्यांच्या मदतीने चित्ता भारतात कोणत्या मार्गाने आणायचा हे ठरवण्यात आलं. आणि मगच या कराराची घोषणा झाली.
मध्यप्रदेशामधील “कुनो” राष्ट्रीय उद्यानामध्ये नामिबिया देशातून हे ३ चित्ते आणले जाणार आहेत. या माहिती पट कार्यक्रमास पटवर्धन हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे, वनपाल नीलेश कुंभार, वनपाल उदय भागवत, वनरक्षक शर्वरी कदम व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम विभागीय वनाधिकारी स्नेहलता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

 
                                    