रत्नागिरी तालुक्यामध्ये मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका वाईन मार्टमध्ये पेमेंट करण्याच्या आलेल्या तांत्रिक अडचणी मुळे एक कर्मचार्याला मारहाण करण्यात आली आहे. घडले असे कि, बुधवारी रोजी रात्री दहा वाजताच्या दरम्यान डी. ए. भोसले प्लाझा शिवाजीनगर येथे अक्षय महेंद्र शिवलकर वय २८, रा. शिवलकरवाडी जाकिमिर्या, रत्नागिरी आणि दिलगेश दशरथ शिवलकर वय ३५, रा. तळेकरवाडी अलावा, रत्नागिरी यांनी ही मारहाण केली आहे.
या दोघांनी ४५० रुपयांची दारु विकत घेतली. त्याचे पैसे गुगल पे करुन दिले. खात्यात ते पैसे जमा झाल्याचे दिसून आले नाही. तेव्हा शिवगण यांनी पैसे जमा झाल्यावर दारु दिली जाईल, सांगितले. याचा राग मनात धरून मारहाण करण्यात आली. सध्या सर्व व्यवहार हे ऑनलाईनच होत असल्याने, बर्याचदा काही ना काही तांत्रिक अडचणी येतात. अनेकवेळा फोनला नेटवर्क नसल्याने किंवा काही वेळा बँकेचा सर्वर डाऊन असल्याने या अडचणी निर्माण होतात.
काही वेळा पैसे अकाउंटला गेलेले असतात पण मेसेज न आल्यामुळे गोंधळ उडतो आणि अशी परिस्थिती निर्माण होते. वाइन मार्टमधील कर्मचार्याने दिलेल्या उत्तरामुळे जे गुगलपे चे पैसे अजून खात्यात आले नाहीत, आधी पैसे द्या, मग दारू देतो, असे सांगितल्याचा राग मनात धरून रात्री घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला दोघांनी लोखंडी रॉडने मारहाण केली.
याबाबत प्रसाद केशव शिवगण वय ५२, राहणार मिरजोळे, रत्नागिरी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता, या दोघांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.