कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकातून महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या रत्नागिरीतील महिलेस शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून कऱ्हाड, कोल्हापुरातील दोन चोऱ्या उघडकीस आल्या आहेत. ही महिला सराईत गुन्हेगार असून राज्यातील विविध पोलिस ठाण्यात तिच्यावर १० गुन्हे दाखल असल्याचे पोलिस रेकॉर्ड आहे. अनघा अनंत जोशी (वय ६२, रा. शिवाजीनगर, रत्नागिरी, सध्या : जाधववाडी, कोल्हापूर) असे संशयित महिलेचे नाव आहे. कोल्हापूर बस स्थानकात सोनसाखळी चोरल्या प्रकरणी शुक्रवारी तिला अटक केली. तिच्यावर सांगली, रत्नागिरी, देवरुख, शिरोळ आदी ठिकाणी सोन्याचे दागिने चोरल्याचे १० गुन्हे दाखल आहेत. याबाबत माहिती अशी की, एक .मे रोजी वैशाली बल्लाप्पा कोटगी या मुलीसह मध्यवर्ती बस स्थानकात आल्या होत्या.
गडहिंग्लज येथे जाण्यासाठी बसमध्ये चढताना त्यांचे गळ्यातील १२.५० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसका देऊन लंपास केली. याची फिर्याद त्यांनी पोलिस ठाण्यात दिली होती. हा गुन्हा रेकॉर्डवरिल महिला आरोपीने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुन्हे शोध पथकाचे अमंलदार व महिला पोलिस उपनिरीक्षक श्वेता पाटील यांनी बस स्थानक परिसरात वेशांतर करुन सापळा लावला. जोशी बसस्थानकात आल्यानंतर तिला ताब्यात घेतले सखोल तपास केला असता तिने चोरीची कबुली दिली. देवरुख पोलिसांना याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, ‘संशयित अनघा जोशी ही रेकॉर्डवरची गुन्हेगार आहे. महिलेची चेन चोरल्याप्रकरणी देवरूख पोलिसांनी तिला अटक करून तिच्याकडुन चेन परत घेतली.