रत्नागिरी तालुक्यातील आरे वारे नजीकच्या ढोकमळे गावामध्ये मान्यता मिळालेले प्राणी संग्रहालय आता त्या ठिकाणाहून दुसरीकडे म्हणजेच मालगुंड येथील ४१ एकर जागेवर होणार आहे. प्राणी संग्रहालयासाठी मालगुंड मधील जागा निश्चित करण्यात आली आहे. त्याचा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी सेंट्रल झू अॅथॉरिटीला पाठविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ७२ कोटी रुपयांना तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. त्यामुळे गणपतीपुळे, मालगुंड या भागाला पर्यटनदृष्ट्या मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे.
आधी प्राणी संग्रहालयासाठी ढोकमळे येथील २० एकर जागेत उभारण्यासाठी परवानगी मिळाली होती. प्राणी संग्रहालयाचा प्रस्ताव सेंट्रल झू अॅथॉरिटीला पाठवण्यात येणार होता. संग्रहालयात वेगवेगळ्या प्रकारचे ४५ प्राण्यांचा समावेश असणार आहे. परंतु अचानक उद्भवलेल्या कोरोना महामारीमुळे जमीन मोजणी पासून सर्वच कामे लांबत गेली. आता लगतच्या १८८ हिस्सेदारांना नोटीस पाठवून जागेची मोजणी करण्यात येणार होती; मात्र हा प्रकल्प सीआरझेड अंतर्गत येत असल्याने केंद्र शासनाने प्रस्ताव नामंजुर केला. त्यामुळे हा ढोकमळे आरे-वारेतील प्राणी संग्रहालयाचा प्रकल्प रद्द झाला आहे.
म्हणून मग प्राणी संग्रहालयासाठी नवीन जागा शोधण्याची जबाबदारी वनविभाग आणि जिल्हा प्रशासनाकडे आली असून, मालगुंडमधील येथे ४१ एकर पर्यायी जागा शोधण्यात आली. त्यामुळे आता हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मालगुंड येथे होणार आहे. गणपतीपुळे, जयगड आदींमुळे या भागात पर्यटकांची वर्दळ असते. प्राणी संग्रहालय झाले तर पर्यटनदृष्ट्या या भागाला आधील महत्त्व प्राप्त होणार आहे. या प्रकल्पासाठी शासनाकडून ७२ कोटी रुपयाच्या निधीला तत्त्वतः मान्यता मिळाली आहे.
प्राणी संग्रहालयानंतर बर्ड पार्क, स्नेक पार्क सुद्धा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारी जागा देखील उपलब्ध आहे. तसे जिल्हा प्रशासनाने आणि वनविभागाने पत्राद्वारे केंद्राला कळवले आहे. लवकरच या प्रकल्पाच्या कामाचा देखील श्रीगणेशा करण्यात येणार आहे.