महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आणि कृषी दिनाचे औचित्य साधून कृषी संजीवनी मोहिमेचा सांगता सोहळा आयोजित करण्यात आला होता. रत्नागिरीतील निवळी येथे कृषी संजीवनी मोहिमेच्या सांगता समारंभाचे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी शेतकऱ्यांना निव्वळ मार्गदर्शनपर भाषण न करता, प्रत्यक्ष शेतीच्या कामाचा अनुभव अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी घेतला. जिल्हा परिषद, कृषी विभाग महाराष्ट्र शासन कृषी विभाग ग्रामपंचायत निवळी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पाली मंडल कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाच्या आखणी बद्दल समाधान व्यक्त केले असून शेतकऱ्यांना कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमावेळी डॉ. वैभव शिंदे यांनी भाजीपाला लागवड व मसाला पिके लागवड याबाबत शेतकर्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच मसाल्याच्या पिकांची लागवड, भात पिकाच्या लागवडीतील चारसूत्री पद्धती, भात पीक लागवड प्रात्यक्षिका बाबत माहिती पुरविण्यात आली. मागील वर्षी आयोजित केलेल्या भात पीक स्पर्धेमध्ये जिल्ह्यात प्रथम आलेल्या शेतकऱ्यांचा पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रत्यक्ष चिखलामध्ये उतरून भाताची रोपे लावणी करण्यासोबत, बैलाच्या सहाय्याने नांगरणी करतानाचा अनुभव रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी सांगितले कि, मे महिन्यामध्ये कोरोना झाल्याने मला आमच्या गावातील शेतीची कामे करता आली नाहीत, पण आज या कार्यक्रमामुळे काही प्रमाणात शेतीच्या कामाचा आनंद घेता आला. अध्यक्षांसोबत कार्यक्रमाला सीईओ इंदूराणी जाखड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने, पंचायत समिती सभापती संजना माने, उपसभापती उत्तम सावंत, कृषी समिती सभापती रेश्मा झगडे, उपसरपंच विलास गावडे, तसेच नारळ संशोधन केंद्राचे अधिष्ठाता डॉ. वैभव शिंदे, भात संशोधन केंद्र शिरगाव संशोधन अधिकारी विजय दळवी, जिल्हा अधीक्षक उर्मिला चिखले, तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांची उपस्थिती होती.