कोरोना काळापासून अनेक गोष्टी प्रत्यक्ष दुकानात न जाता ऑनलाईन मागवण्याची त्याचप्रमाणे त्याचे पेमेंटसुद्धा ऑनलाईन पद्धतीने करायची एक प्रकारे सवयच जडली आहे. परंतु, अनेकदा ऑनलाईन व्यवहारांमध्ये फसवणूक होऊन आर्थिक नुकसान होण्याचे प्रकार घडताना दिसून येत आहेत.
ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहण्याच्या सूचना पोलिस, बँकेकडून वारंवार देण्यात येत असतात. रत्नागिरी शहरामधील एका मुलीची अशीच ऑनलाईन फसवणूक झाली आहे. समस्यांचे निवारण करण्याच्या बहाण्याने एनी डेस्क ॲप डाउनलोड करण्यास सांगून त्याद्वारे तरुणीची १ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे.
ही तरुणी रत्नागिरी शहरातील झाडगाव येथील राहत असून , हा प्रकार १ मार्च रोजी दुपारी १२.२० वाजता घडला. याबाबत निकिता संतोष गिरकर वय २७ , रा . जोशी आर्केड झाडगाव, रत्नागिरी हिने शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , मंगळवारी दुपारी फ्लिपकार्ट केअर सेंटर संदर्भात येणाऱ्या अडचणीबाबत तिने फोन केला होता.
बोलणाऱ्या अज्ञाताने तिला एनी डेस्क ॲप डाउनलोड करण्यास सांगून त्याचा युजर आयडी मागून घेतला. एनी डेस्क ॲपची अनेक फसवणुकीची प्रकरणे ताजी तवानी असताना त्यामध्ये या एका प्रकरणाची भर पडली आहे. त्या अज्ञात माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून निकिताने आपला आयडी त्याला सांगितला. त्यानंतर काही वेळातच तिच्या खात्यातून १ लाख रुपये काढल्याचा मेसेज तिला आला.
त्यावरून आपली ऑनलाइन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पोलीस स्थानकात रीतसर तक्रार दाखल केली. याप्रकरणी अधिकचा तपास पोलीस निरीक्षक विनीत चौधरी करीत आहेत.