राज्यासह रत्नागिरी तालुक्यात देखील नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात १५ जून पासून झाली. दोन वर्ष कोरोनामुळे शाळा ऑनलाईन घेतल्या जात होत्या. परंतु त्यामुळे ज्या लहानग्यांनी कधी शाळा पहिलीच नाही त्यांना शाळेचा पहिला दिवस खूपच खास ठरणार होता. यासाठी जि.प. सीईओ डॉ. इंदुराणी जाखड यांनी पहिले पाउल हा विशेष शैक्षणिक उपक्रम आखला.
कोरोना कालावधीत ऑनलाईन पहिलीत प्रवेश केलेल्यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी आणि नवे पाऊल टाकण्यास सज्ज असलेल्या मुलांना किमान अक्षर व अंक ओळखता यावेत, यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या संकल्पनेतून राबवलेल्या पहिले पाऊल हा शैक्षणिक उपक्रम रत्नागिरी जिल्ह्यात यशस्वी झाला. आणि हा उपक्रम या शैक्षणिक वर्षापासून राज्य स्तरावर राबवण्यात येत आहे.
कोरोनातील परिस्थितीमुळे राज्यात प्रत्यक्ष शाळेत जाऊन अध्यापन बंद होते. त्यामुळे पहिलीत प्रवेश घेतलेले विद्यार्थी प्रवेश केवळ हजेरीपटावरच होता, पण प्रत्यक्षात पहिलीच्या वर्गात त्यांचे पहिलं पाऊल पडलेलेच नाही. केवळ पर्याय म्हणून ऑनलाइन अध्यापन चालू होते. परंतु, या लहानग्यांची मानसिकता पाहता, त्यांचा पाया कच्चा राहिल्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर त्याचे परिणाम होऊ लागला. ही परिस्थिती लक्षात घेऊन शिक्षण विभाग आणि महिला बालकल्याण विभागासह प्रथम फाउंडेशनच्या मदतीने पहिलं पाऊल हा उपक्रम विद्यार्थ्यांची शाळापूर्व तयारी करण्याच्या उद्देशाने आखण्यात आला.
यावर्षी पहिलीच्या वर्गात पहिलं पाऊल टाकणारे विद्यार्थी, पहिलीच्या वर्गात न बसताच दुसरीत गेले आणि दुसरीतून तिसरीत जाणाऱ्या मुलांवर एप्रिल ते जून २०२१ या कालावधीत पहिलं पाऊल अंतर्गत विशेष मेहनत घेण्यात आली. यासाठी शिक्षण विभागाने पालकांची मदत देखील घेतली. सीईओ डॉ. इंदुराणी जाखड यांनी ही संकल्पना राबवण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांसह सर्व यंत्रणेला नियोजन आणि विशेष मार्गदर्शन केले होते.
सर्वात महत्वाची भूमिका यामध्ये गटशिक्षणाधिकारी, अंगणवाडी सेविका, प्राथमिक शिक्षकांमार्फत पालकांशी संवाद साधत बजावली. सुट्टीच्या कालावधीत करावयाच्या उपक्रमाविषयी माहिती दिली आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवाहन केले. त्याला प्रतिसादही उत्तम मिळाला.