राज्यसभेत अणु ऊर्जा विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी दिलेल्या लेखी उत्तरानुसार, जैतापूर अणु ऊर्जा प्रकल्पाला केंद्र सरकारने तत्वतः मान्यता दिली आहे. मात्र यावरुन शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सडकून टीका केली आहे. “गाडला गेलेला विषय केंद्र सरकार पुन्हा उकरुन काढत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
स्थानिक लोकांनी याबाबत अनेकदा विरोध दर्शवला आहे. अणु ऊर्जा हवी कशाला ? विजेची कमतरता आहे का या देशामधे ? सोलर एनर्जीचा वापर करण्याचा विचार करा, या देशामध्ये केवळ अणु उर्जा प्रकल्पाच्या मागे का लागलं जात आहे? संपूर्ण जगाने होणाऱ्या दुष्परीनामाचा विचार करून अणु ऊर्जा नाकारली आहे, पण भारत मात्र शेपूट पकडूनच आहे ” अशी संतप्त प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.
वीजेचे कमी झालेले दर बघता अणु ऊर्जेपासून तयार होणाऱ्या वीजेचे दर हे केंद्र सरकारला परवडणारे नाहीत, एवढ्या वाढीव दराने वीज घेणे म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखं आहे . यासाठी कोणी तयार होणार नाही. हा निव्वळ बिनडोकपणाचा हा विचार आहे.
त्याचप्रमाणे, त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड-जामसंडे नगर पंचायतच्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार सभेत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरीतील नाणार रिफायनरी संदर्भात कडाडले आहेत. या नाणार रिफायनरीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमधील तीन गावांचे भूसंपादन केलं जाणार होत. त्यामुळे खास. राऊत यांनी देवगड जामसंडे नगरपंचायत प्रचारसभेच्या व्यासपीठावरून नाणार रिफायनरी कोणत्याही परिस्थितीत इथे होणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे.
यावेळी भाजपचे नेते प्रमोद जठार यांच्यावरही खोचक टीका केली आहे. प्रमोद जठाराना झोप लागत नसेल, जोपर्यंत रिफायनरी हा शब्द डोक्यातून जात नाही, तोपर्यत प्रमोद जठाराना झोप येणार नाही. रिफायनरीच्या नावाखाली जी जमीन हडप केली. त्या जमिनीचा मोबदला घेण्यासाठी आसुसलेले प्रमोद जठारांच्या दहा पिढ्या झाल्या तरी, नाणारला रिफायनरी होऊ देणार नाही. काय तडफडायचे तेवढं तडफडा. प्रमोद जठार म्हणजे दलालीतील नंबर एक माणूस, नारायण राणे आणि त्यांचे कुटुंबीय दुटप्पी भूमिका घेणारे आधी नाणारला विरोध आणि आता भाजप मध्ये गेल्यानंतर लोटांगण घातलं. असलेले नसलेले सगळे नारळ फोडा मला काही फरक पडत नाही, अशा शब्दांत राऊत म्हणाले.

