गोरगरिबांचा आधार असलेल्या जिल्हा रुग्णालयाची वरून रंगरंगोटी सुरू आहे. मात्र, अंतर्गत व्यवस्था पोखरली आहे. गेली कित्येक महिने भूलतज्ज्ञ नाही, केसपेपरसाठी वयोवृद्धांना पहिल्या मजल्यावर जावे लागते. एक्स-रे सारखी सुविधा आहे; परंतु फिल्म साध्या झेरॉक्स पेपरवर दिली जाते. सीटीस्कॅन मशीन आहे; परंतु पेशंटला द्यायला फिल्म नाही. सर्वत्र दुर्गंधी आहे, अशा अनेक समस्यांचा पाढा वाचत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिष्ठाता रामानंद यांना धारेवर धरले. जिल्हा शासकीय रुग्णालय आता शासकीय महाविद्यालयाकडे वर्ग झाले आहे. त्यामुळे याची जबाबदारी महाविद्यालयाचे अधिष्ठाता रामानंद यांच्याकडे आहे.
रुग्णालयाच्या गैरसोयींबाबत यापूर्वी देखील अनेक पक्षांनी तक्रारी केल्या. ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्वसामान्यांचे हे हक्काचे रुग्णालय असल्याने पोटतिडकीने या समस्या मांडल्या जात आहेत; परंतु त्या सुटताना दिसत नाहीत. रोज नवीन समस्या पुढे येत आहेत. या समस्यांबाबत आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी थेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता रामानंद यांना धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली. जिल्हा रुग्णालयात कोणतीही समस्या आली, तर डीन किंवा त्यांचे प्रतिनिधी हजर नसतात.
भूलतज्ज्ञामुळे राहिलेल्या शस्त्रक्रिया ताबडतोब करण्यात याव्यात. अनेक समस्या आपण जातीनीशी लक्ष देऊन सोडवतो, असे आश्वासन डीन रामनाथ यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले. शिवसेना तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे, जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, शिवसेना शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, उपशहरप्रमुख नितीन तळेकर, महिला शहरप्रमुख मनीषा बामणे, महिला विभागप्रमुख राजश्री लोटणकर, पूजा जाधव, विभागप्रमुख राजन शेटे, बिपीन शिवलकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.