गेल्या काही महिन्यांपासून शहरात बिबट्याचा संचार सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्या बिबट्याला ट्रॅप करण्यासाठी वनविभागाने दोन ट्रॅप कॅमेरे आणि बिबट्याला पकडण्यासाठी पिंजराही बसवला आहे. त्यात तो बिबट्या दिसला नाही; मात्र राजापूर शहरातील वरचीपेठ येथील भरवस्तीतील गांधी क्रीडांगण येथे एका रेडकावर बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना पुढे आली आहे. मागील दीड-दोन महिन्यांपासून शहरात बिबट्याचा वावर वाढलेला आहे. सायंकाळी बिबट्या बिनधास्तपणे फिरत असल्याचे अनेक ग्रामस्थांनी पाहिले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झालेली आहे.
त्या बिबट्याला पकडण्यासाठी शहरामध्ये वनविभागातर्फे पिंजरा बसवण्यात आला. तसेच बिबट्याचा संचार असलेल्या भागामध्ये दोन ट्रॅप कॅमेरेही बसवले आहेत; मात्र, पिंजऱ्यामध्ये अद्यापही बिबट्या अडकलेला नाही तसेच बिबट्याचा संचार टिपण्यासाठी लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्येही तो ट्रॅप झाला नाही. दोन दिवसांपूर्वी भरवस्तीतील राजीव गांधी क्रीडांगण येथे म्हैशीच्या रेडकावर मध्यरात्री बिबट्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याचा प्रकार पुढे आला आहे. राजापूरचे वनपाल जयराम बावदाने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी वनविभागाकडून बिबट्याचा बंदोबस्त करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे बावदाने यांनी सांगितले.
बिबट्याची दहशत – गेल्या काही महिन्यांपासून शहरातील लोकवस्तीमध्ये बिबट्याचा बिनधास्तपणे वावर सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी बिबट्याने पोलिसलाईन परिसरातील कोदवलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका महिला दुचाकीस्वारावर हल्ला केला होता. एवढेच नव्हे तर, शहरातील मुख्य रस्त्यावरील पोलिस ठाण्यामध्ये घुसून बिबट्याने कुत्र्याची शिकार केली. ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती.