मुंबई-गोवा महामार्गावर कोदवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत पुनर्वसन वसाहत आहे. त्या भागात लोकवस्ती वाढत असून, हॉटेल आणि अन्य दुकानेही थाटलेली आहेत. या भागामध्ये दिवसेंदिवस लोकांची रहदारीही वाढत आहे. तहसीलदार निवास, गॅस एजन्सी व हॉटेल वॉटर येथील वळण या भागात कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. सतत साचणारा कचरा उचलण्यासाठी यंत्रणाच नसल्याने पुनर्वसन वसाहत म्हणजे कचऱ्यासाठीचे डम्पिंग ग्राऊंडच बनलेले आहे. पुनर्वसन वसाहतीत साचलेला कचरा उचलण्यासाठी कोदवली ग्रामपंचायतीकडून घंटागाडी सुरू केली होती. त्याच्या साह्याने त्या भागातील कचरा उचलला जात होता; मात्र, गेल्या काही दिवसांपासून कचरा उचलण्यासाठी घंटागाडीही बंद झाली आहे. सध्या ऊन-पाऊस असे वातावरण आहे. त्यामुळे डेंगी, मलेरियासारख्या साथरोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे ग्रामपंचायत प्रशासन गांभीयनि लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच ठिकठिकाणी साचलेसा कचरा तत्काळ उचलावा आणि त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी, अशी मागणीही केली जात आहे.
१५० हून अधिक इमारती – पुनर्वसन वसाहतीची लोकसंख्या ५०० हून अधिक असून सुमारे १५० हून अधिक इमारती आहेत. त्यापैकी काही इमारतींचा वापर निवासासाठी केला जातो. व्यापारी वापरासाठीच्या इमारतींमध्ये हॉटेल, दुकाने आदींचा समावेश आहे. त्या इमारतींचा कर ग्रामपंचायतीकडून आकारला जातो. त्यामधून कोदवली ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळते.
पुनर्वसन वसाहत ग्रामपंचायतीच्या हद्दीत – अर्जुना-कोदवली नद्यांना १९८१, १९८३ दरम्यान आलेल्या पुरानंतर पूररेषा निश्चित केली. पूरग्रस्त म्हणून नोंद झालेल्यांसाठी शहराजवळील कोदवली ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये पुनर्वसन वसाहत निर्माण करण्यात आली. त्या वसाहतीमध्ये घर बांधण्यासाठी पूरग्रस्तांना शासनाकडून भूखंड देण्यात आले. ही वसाहत राजापूर शहरातील लोकांची असली तरीही हा भाग कोदवली ग्रामपंचायतीला जोडलेला आहे.