विविध प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण सगळीकडेच वाढत चालले आहे आणि त्यामध्ये ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. काही ठिकाणी तर नातेवाईकांकडून सुद्धा हातोहाथ फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत.
बँकेच्या संयुक्तपणे घेतलेल्या लॉकरमध्ये ठेवलेले मंदिरातील सुमारे ९ लाख रुपये किमतीचे दागिने काढून परस्पर विक्री करणार्या काकाच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीधर विठ्ठल भावे रा. पूणे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या विरोधात त्याची पुतणी धनश्री अमर अभ्यंकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
दिलेल्या तक्रारीनुसार, धनश्री अभ्यंकर आणि त्यांचे काका श्रीधर भावे या दोघांनी मंदिरातील दागिने रत्नागिरीतील शिवाजीनगर येथील जनता सहकारी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले होते. १८ फेब्रुवारी २०१२ रोजी हे दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले होते. परंतु १६ मार्च २०१५ ते ३१ जानेवारी २०२२ या कालावधीमध्ये श्रीधर भावे यांनी धनश्री अभ्यंकर यांना कोणतीही कल्पना न देता लॉकरमधील सुमारे नऊ लाख रुपये किमतीचे दागिने काढून त्यांची परस्पर विक्री केली आहे.
मंदिरातील दागिने बँकेत सुरक्षित असल्याने निर्धास्त असलेल्या धनश्री अभ्यंकर यांनी रत्नागिरीमध्ये आल्यावर दागिन्यांबद्दल चौकशी केली असता, काका श्रीधर भावे यांनी ते दागिने लॉकरमधून बाहेर काढल्याचे समजले. त्यांनी याबाबत काकांना विचारल्यानंतर काकांनी दागिने काढून त्याची विक्री केल्याचे सांगितले. त्यावेळी नकळतपणे आपली फसवणूक झाल्याचे धनश्री अभ्यंकर यांच्या लक्षात आले. आणि या संदर्भात त्यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, याबाबतचा अधिक तपास शहर पोलिसांमार्फत सुरु आहे.