ईव्हीएम मशिन हटवा, देश वाचवा… अशा गगनभेदी घोषणा देत मंगळवारी भारत मुक्ती मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभरात ५ जानेवारीपासून भारत मुक्ती मोर्चातर्फे ईव्हीएम मशिन विरोधात जोरदार निदर्शने केली जात आहेत. भारत मुक्ती मोर्चातर्फे चार टप्प्यांमध्ये आंदोलन होणार आहे. पहिल्या टप्प्यात ५ जानेवारी रोजी ५६७ जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्यात आले. १० जानेवारी रोजी दुसरा टप्पा पार पडला तर मंगळवारी १६ जानेवारी रोजी तिसरा टप्पा पार पडला. तिसऱ्या टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले.
दुसऱ्या टप्प्यात जोरदार निदर्शने करण्यात आली. १४० करोड जनतेच्या लोकशाहीची आरएसएसने धोका देऊन हत्त्या केली आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. याबाबतचे निवेदन भारत मुक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांना दिले. यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अजय तांबे, जिल्हा प्रभारी अशोक पवार, तालुकाध्यक्ष पंकज सावंत, समिक्षा पवार, युयुत्सु आतें, संजय आयरे, संजय कदम, बी. के. पालकर, भागवत जाधव आदी उपस्थित होते.