तालुक्यातील कुरतडे येथील रस्त्याच्या कामाला निधी मंजूर केला आहे; मात्र तरीही ते अद्यापही केलेले नाही. ते काम तातडीने चालू न केल्यास आंदोलन करू, असा इशारा उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला. याबाबतचे निवेदन ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. शिवसेना तालुकाप्रमुख बंड्या साळवी, हरचिरीचे विभागप्रमुख महेंद्र झापडेकर, उपविभागप्रमुख भाऊ गांगण यांच्यासह या परिसरातील ग्रामस्थांनी बांधकाम विभागावर धडक दिली.
या वेळी विभागप्रमुख विजय देसाई, मयूरेश पाटील, कुरतडे माजी सरपंच सुभाष भोवड, सरपंच बंडबे, टिके सरपंच भिकाजी शिनगारे, संजय शिवगण, गुरुदास पालवकर, उपसरपंच सूरज पवार, प्रफुल्ल भातडे, प्रकाश वीर, दिनेश आंग्रे, अंकुश गोविलकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. काजरघाटी ते हरचिरी रस्ता, कुरतडे रस्ता तातडीने नूतनीकरण करा यासाठी गणपतीपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता भारती रावसाहेब यांची भेट घेतली होती.
त्या वेळी ही कामे तातडीने चालू केली जातील, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. त्यानुसार काजरघाटी-हरचिरी रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तत्पर कार्यवाही केल्याबद्दल शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले; मात्र हरचिरी विभागातील कुरतडे गावाकडे जाण्याच्या रस्त्याचे काम तातडीने चालू करावे, अशी सूचना केलेली होती. त्या रस्त्याचे काम मंजूर असूनही सुरू झालेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.