26.4 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriप्रतीक्षा संपली …स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहाचे नूतनीकरण सुरू

प्रतीक्षा संपली …स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहाचे नूतनीकरण सुरू

पालकमंत्री उदय सामंत यांनी याची गंभीर दखल घेत नाट्यगृह दुरुस्तीसाठी सकारात्मक पावले उचलली.

कोकणातील सर्वांत मोठे नाट्यगृह म्हणून वि. दा. सावरकर नाट्यगृहाची ओळख आहे. (कै.) माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांच्या विशेष प्रयत्नाने हे नाट्यगृह उभारण्यात आले. कालांतराने या नाट्यगृहाची अवस्था अतिशय वाईट झाली. येथील गैरसोयींमुळे नाट्यकर्मी आणि प्रयोगासाठी येणाऱ्या कलाकारांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. या नाट्यगृहामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात आली; परंतु ती कूचकामी ठरली. अक्षरशः बर्फाच्या लाद्या फॅनजवळ ठेवून वातावरण थंड करण्याची वेळ आयोजकांवर येत होती. वातानुकूलीत यंत्रणेच्या दुरुस्तीवर खर्च करण्यात आला; मात्र समस्या ‘जैसे थे’ होती.

या परिस्थितीत अनेक चांगले प्रयोग आले. काही अभिनेत्यांना उकाड्याने भोवळ आली. अभिनेता भरत जाधव यांनी गैरसुविधांबाबत थेट भाष्य केले. त्यावरून सांस्कृतिक क्षेत्रात उलटसुलट चर्चा रंगली. त्यामुळे रत्नागिरीचे नाव खराब झाले. पालकमंत्री उदय सामंत यांनी याची गंभीर दखल घेत नाट्यगृह दुरुस्तीसाठी सकारात्मक पावले उचलली. तसेच नाट्यकर्मींनीही या गैरसुविधांबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन दुरुस्तीची मागणी केली होती. त्यामुळे नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी ७ कोटी मंजूर झाले आहेत. निर्माण ग्रुपने याचा ठेका घेतला असून, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे.

दुरुस्तीला सुरुवात – ठेकेदाराने कामाला सुरुवात केली आहे. नाट्यगृहातील व्हरांड्यापासून कामाला सुरुवात झाली आहे. नाट्यगृहात वातावरण थंड करण्यासाठी बसवलेले कुलर, वातानुकूलन (एसी) यंत्रणा खाली उतरवण्यात आली आहे. स्वतंत्र फिडर नसल्यामुळे जनरेटवर एसी चालवला जात होता. त्यासाठी लागणाऱ्या इंधनाचा मोठा खर्च होता. एसीचे भाडे २६ ते २७ हजारांवर जात होते. नॉनएसी ८ ते १० हजार होते; परंतु एसीसाठी स्वतंत्र महावितरणचे फिडर घेण्यात येणार आहे. त्यामुळे डिझेलचा खर्च कमी होऊन युनिटप्रमाणे भाडे आकारले जाण्याची शक्यता आहे. नाट्यगृहाचा रंगमंच अजून सुधारला जाणार आहे. चांगल्या दर्जाची साऊंडसिस्टिम लावली जाणार आहे. अॅकॉस्टिक, नाट्यगृहाची रंगरंगोटी दुरुस्ती केली जाणार आहे. नाट्यगृहाच्या बाहेरील भागाची दुरुस्ती सुरू झाली आहे.

नाट्यकर्मींच्या मागण्या – नाट्यगृहाचे नामफलक, नाटकाचे बोर्ड, बॅनर लावण्यासाठी निश्चित जागा. नाट्यगृहासमोरील रस्त्यावर होणारे गाड्याचे पार्किंग, नाट्यगृहासाठी वॉचमन, प्रयोगावेळी साफसफाई, नादुरुस्त खुर्च्या, खुर्ची क्रमांक, लाईटव्यवस्था त्यात सुधारणा करणे, संपूर्ण प्रेक्षकगृह अॅकॉस्टिक करणे, नवीन वातानुकूलित यंत्रणा (विजेवर चालणारी) बसवणे, विंगेतील कापड बदलणे, विंग पुढे-मागे करण्यासाठी ट्रॅकची लांबी , रंगमंचाच्या दिशेने वाढवणे, मुख्य पडद्याची वेळोवेळी योग्य स्वच्छता राखणे, रंगपटातील बल्ब, खिडक्यांचे पडदे आणि वातानुकूलित सेवा अद्ययावत करण्याची रंगकर्मीची मागणी आहे.

RELATED ARTICLES

Most Popular