26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeChiplunनोव्हेंबर अखेरपर्यंत एन्रॉन पुलाची दुरुस्ती सुरू

नोव्हेंबर अखेरपर्यंत एन्रॉन पुलाची दुरुस्ती सुरू

दोन्ही बाजूने पूल खालच्या दिशेने खचला.

२०२१ च्या महापुरात खचलेल्या शहरातील एन्रॉन पुलाच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. मे महिन्यात संबंधित ठेकेदाराने पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण केल्याने या पुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. दरम्यान, पावसाळ्यात बंद ठेवण्यात आलेले हे काम नोव्हेंबर अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या टप्प्यातील दुरुस्तीचे काम मार्गी लागल्यानंतर या पुलावरून अवजड वाहनेही धावणार आहेत. महापुरात एन्रॉन पुलाचा एक पिलर खचला होता. यामुळे दोन्ही बाजूने पूल खालच्या दिशेने खचला. परिणामी, या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली होती.

तरीही काही मोटार सायकलस्वार या धोकादायक पुलावरून दुचाकी नेत होते. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या दोन्ही बाजूला खड्डे खणून पूल वाहतुकीसाठी बंद केला. यानंतर या पुलाचे काम मार्गी लागावे यासाठी स्थानिक नागरिक व आमदार शेखर निकम यांनी सातत्याने पाठपुरावा केला. सार्वजनिक बांधकाम विभागाने दोनवेळा या पुलाच्या दुरुस्तीची निविदा काढली; मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. अखेर तिसऱ्यावेळी ‘देवरे अँड सन्स’ या नाशिकमधील कंपनीला पुलाच्या दुरुस्तीचा ठेका देण्यात आला. कंपनीने पावसाळ्यापूर्वी या कामाला सुरवात केली. पहिल्या टप्प्यात खचलेल्या ठिकाणचा स्लॅब उखडून आतील स्टील मोकळे केले.

जो पिलर खचला होता त्या पिलरच्या बाजूने हायड्रोलिक जॅक लावून खचलेला स्लॅब दोन्ही बाजूने वर उचलण्यात आला. खचलेला एन्रॉन पूल समपातळीत आणण्यात आला. मे अखेरीसपासून या पुलावरून दुचाकी तसेच तीनचाकी रिक्षा वाहतुकीसाठी सोडल्या जात आहेत. किमान दुचाकी तसेच रिक्षासाठी एन्रॉन पुलावरील वाहतूक सुरू झाल्याने बायपासमार्गे मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर तसेच शहरात जाणे-येण्यासाठी नागरिकांना दिलासा मिळाला आहे; मात्र अवजड वाहतूक बंदच असल्याने मोठ्या वाहनांना गोवळकोट रोड, पेठमापमार्गे वळसा घेऊन प्रवास `करावा लागत आहे. यामध्ये वाहतूककोंडीचीही समस्या वारंवार उभी राहात आहे तर असंख्य अवजड वाहनांना बहादूरशेखमार्गेच प्रवास करावा लागत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular