“माझा रत्नागिरी मतदार संघ मला ‘प्रति सिंगापूर’ करावयाचा आहे. या मतदार संघात आता एकाचवेळी अनेक विकास कामे सुरु झाली आहेत. ती सर्व पूर्ण करुन येथे ‘चौफेर’ विकास करुन दाखविणार, एवढेच नव्हे तर या भूमीत ‘आंतरराष्ट्रीय दर्जाचे’ पर्यटन विकसीत करणार जेणे करुन ही परशुराम भूमी सुजलाम सुफलाम होईल व येथील सर्वांना ‘बरकत’ प्राप्त होईल” असे प्रतिपादन ना. उदय सामंत यांनी केले. ना. उदय सामंत यांची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मुलाखत घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
सर्वांना हेवा वाटेल! – ना.उदय सामंत यांनी सांगितले, “संपूर्ण भारताला हेवा वाटेल असा या परशुराम भूमीचा मजबूत विकास आम्हाला करुन दाखवायचा आहे. त्यासाठी आम्ही भक्कम विकासाचा ‘मास्टर प्लॅन’ सज्ज ठेवला असून सुयोग्य संधीची आम्ही वाट पहात होतो व ती संधी आता चालून आली आहे” असे त्यांनी स्पष्ट केले. निधी मंजुरीचे अधिकार ना. उदय सामंत हे ‘कोकणचे भाग्यविधाते’ म्हणून सुपरिचीत आहेत. त्यांनी सांगितले, “भक्कम निधी मंजूर करुन आणण्यासाठी तसाच ताकदीचा अधिकार हाती यावा लागतो. मला मंत्रिमंडळात राज्याचे उद्योग मंत्रीपद मिळाले आणि मग माझ्या हातात निधी मंजुरीचे अधिकार आले” असे त्यांनी सांगितले.
संधीचे सोने करणार! – ना. उदय सामंत विलक्षण पोटतिडीकीने बोलत होते. त्यांनी सांगितले, “या संधीचा मी माझ्या मतदार संघासाठी पुरेपूर उपयोग करणार. आम्ही विविध प्रकल्प अहवाल तयार करुन त्यांना मंत्रिमंडळाची मंजुरी घेतली व तातडीने निधीची तरतूद करुन घेतली. त्यामुळे एकाचवेळी अनेक विकास प्रकल्पांचे काम सुरु झालेले पहावयास मिळत आहे” असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रति सिंगापूर होणार! – ना. उदय सामंत विकासाच्या तळमळीने बोलत होते. त्यांनी सांगितले, “हा माझा रत्नागिरी मतदार संघ ‘प्रति सिंगापूर’ व्हावा यासाठी येथे अनेक अत्याधुनिक व ‘हायटेक’ तंत्रज्ञानयुक्त प्रकल्प व उपक्रम सुरु होतील. जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा या मतदार संघात वापर होईल. साऱ्या देशाला हेवा वाटेल असा या मतदार संघाचा विकास आम्ही करणार आहोत” असे त्यांनी स्पष्ट केले.
ग्रीन प्रोजेक्ट – ना. उदय सामंत यांनी काही ‘भावी संकल्प’ देखील सांगितले, “रत्नागिरी मतदार संघात आम्ही कोणताही प्रदूषणकारी प्रकल्प कदापी आणणार नाही. येथे ‘ग्रीन प्रोजेक्ट’ व ‘हायटेक’ तंत्रज्ञानावर आधारीत इलेक्ट्रॉनिक प्रकल्प आणण्याचा आम्ही संकल्प केला आहे”.
३८००० युवकांना नोकऱ्या – “त्यासाठीच रत्नागिरीत सेमी कंडक्टर इलेक्ट्रॉनिक प्रकल्प व खंडाळा परिसरात संरक्षण साहित्य प्रकल्प येत आहेत. या २ प्रकल्पामधून सुमारे ३८००० युवकांना येथेच नोकऱ्या मि ळतील. रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा व राजापूर या लगतच्या तालुक्यातील युवकांना त्याचा मोठा लाभ होईल” असे त्यांनी नमूद केले.
आधुनिक रायफल्स – ना. उदय सामंत हे रत्नागिरीचे ‘कर्तबगार सुपुत्र’ होत. त्यांनी सांगितले, “खंडाळा येथील संरक्षण साहित्य निर्मिती प्रकल्पात सरहद्दीवर लढणाऱ्या जवानांसाठी आधुनिक रायफल्स तयार होतील. या दोन्ही प्रकल्पांचे भूमीपूजन झाले असून नजीकच्या काळात हे प्रकल्प कार्यान्वीत होतील” अशी त्यांनी माहिती दिली.
आंतरराष्ट्रीय पर्यटन – ना. उदय सामंत यांचे ‘विकासाचे व्हिजन’ फार मोठे आहे. त्यांनी सांगितले, “माझ्या या मतदार संघातील निसर्ग सौंदर्याची पुरेपूर जपणूक करुनच ग्रीन प्रोजेक्ट’ आणणार आहोत. तसेच या भूमीत आम्हाला “आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन” आणावयाचे आहे”.
गोव्यासारखे बीच व रॉक्स – “त्यासाठीच मालगुंड येथे सुसज्ज व अत्याधुनिक प्राणी संग्रहालय, आरे वारे बीच सुधारणा, जागोजागी किनारपट्टीवर सागरी अॅडव्हेंचर गेम्स सेंटर्स, गोव्याप्रम ाणे बीचवर शॅक्स, गावोगाव होम स्टे, रत्नागिरीत सिंगापूर प्रमाणेच भव्य दिव्य ‘टनेल मत्स्यालय’ असे अनेक ‘ग्रीन प्रोजेक्ट’ येथे नजीकच्या काळात सुरु . करण्याचा आमचा निर्धार आहे” अशा शब्दात त्यांनी माहिती दिली.
ही देवभूमी ! – ना. उदय सामंत यांनी जणू आपला ‘संकल्पनामा’ सांगितला की, “रत्नाग्रिी ही ‘देवभूमी’ म्हणून ओळखली जाते. या देवभूमीत अनेक प्राचीन देवस्थाने आहेत. ही देवस्थाने देशातील लाखो बांधवांची कुलदैवते व श्रद्धास्थाने आहेत. अशा सर्व देवस्थानांचा व तीर्थस्थानांचा आम्ही नजीकच्या काळात भक्कम विकास करणार. त्यामुळे या भूमीत ‘अध्यात्मिक पर्यटन’ देखील सुरु होईल” असे त्यांनी नमूद केले.
देवस्थाने विकास सुरु ! – ना. उदय सामंत यांनी पुढे सांगितले, “त्यासाठी अनेक देवस्थाने व तीर्थस्थानांच्या विकास कामांना सुरुवातही झाली आहे. रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी, गणपतीपुळे तीर्थक्षेत्र, आडीवरे येथील धूतपापेश्वर देवस्थान अशा तीर्थस्थानांची विकास कामे सुरु देखील झाली आहेत” याकडे त्यांनी लक्ष वेधले.
भगिनींसाठी प्रकल्प ! – ना. उदय सामंत भरभरुन बोलत होते. त्यांनी सांगितले, “येथील भगिनींसाठी देखील आम्ही शाश्वत व भक्कम विकास कामे करणार आहोत. महिलांसाठी भव्य व सुसज्ज ‘उद्योग भवन’, महिला बचत गटांसाठी विविध ठिकाणी बाजारपेठा असे येथील भगिनींना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी विविध प्रकल्प सुरु करण्याचा आमचा संकल्प आहे” असे त्यांनी सांगितले.
कौशल्य विकास केंद्रे – ना. उदय सामंत हे कोकणचे अभ्यासू, व्यासंगी व कर्तबगार नेते होत. त्यांनी सांगितले, “हा सारा मतदार संघ विविध प्रकल्पांनी, उद्योगांनी व पर्यटनांनी गजबजून गेला की मग येथे कुशल व प्रशिक्षीत तरुणांना नोकऱ्यांची मोठी संधी प्राप्त होईल. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देऊन ‘कुशल बनविण्यासाठी’ विविध ‘कौशल्य विकास केंद्रे’ सुरु करण्याचा निर्णय झाला आहे” असे त्यांनी स्पष्ट केले.
फूड प्रोसेसिंग उद्योग – ना. उदय सामंत यांच्या प्रयत्नाने या मतदार संघात आज घडीला सर्वाधिक विकास कामे सुरु आहेत. त्यांनी सांगितले, “येथील निसर्ग संपत्तीवर आधारीत असे उद्योग म्हणजे फ ड प्रोसेसिंग, मत्स्योद्योग प्रकल्प, आंतरराष्ट्रीय दर्जाचे मासे, कालवे, शिंपले, खेकडे व कोळंबी पालन व प्रोसेसिंग प्रकल्प सुरु करण्याचा आमचा निर्धार आहे” अशी माहिती त्यांनी दिली.
सुसज्ज इन्फ्रास्ट्रक्चर – ना. उदय सामंत हे विकासच्या कल्पनेने भारावलेले नेते होत. त्यांनी सांगितले, “अशा प्रकारे पर्यटनाला ‘बुस्ट’ मिळण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा म्हणजे संपूर्ण मतदार संघात रस्ते, पाखाड्या, पूल अशा सुविधांचे जाळे उभारण्यात येईल. अशा प्रकारे ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ सज्ज झाल्यावर येथे डोमेस्टीक व इंटरनॅशनल पर्यटकांचा ओघ सुरु होईल आणि मग येथे ‘बरकत’ येईल” अशा सोप्या शब्दात त्यांनी सारी संकल्पना समजावून दिली.
विकासाचा संकल्प ! – ना. उदय सामंत यांनी रत्नागिरी मतदार संघाच्या विकासाचा ध्यास घेतला आहे. त्यांनी सांगितले, “माझा हा मतदार संघ मला ‘प्रति सिंगापूर’ बनवायचा आहे… साऱ्या देशाला हेवा वाटेल असा येथे विकास घडवायचा आहे… ही ‘देवभूमी’ आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यायची आहे आणि येथील माझ्या बंधू भगिनींना उत्तम ‘बरकत’ मिळून त्यांच्या हातात बक्कळ पैसा खुळखुळावा यासाठी माझी सारी धडपड आहे” अशा भावविवश शब्दात त्यांनी ‘विकासाचा संकल्प’ विषद केला.