‘मी माझ्या कोकणचा पहिला विचार करतो. अधिवेशन आले कि मी माझ्या कोकणसाठी काय मागायचं…. मला एखादी योजना करायची असेल तर यातून कोकणसाठी काय देता येईल, याचा पहिला विचार करतो. सातत्याने माझा कोकण विकसित झाला पाहिजे याचाच विचार करतो. कोकण ही रत्नांची खाण आहे. कोकणात विद्वत्ता आहे. कोकणातील डॉक्टर अमेरीकेत जातात परदेशात जाऊन सेवा देत असतात. तज्ञ लोक, शास्त्रज्ञ आपल्या कोकणातून जातात. विचारवंत, साहित्यिक, जे.जे. कोणी थोर पुरुष झाले, ते अधिक कोकणातीलच आहेत. अशी कितीतरी नावे सांगता येतील. कोकणातील त्या ठिकाणी विरासत आहे. कोकण येवढे वैभव संपन्न आहे. त्यामुळे वैभव संपन्न असलेल्या कोकणला आमच्या सारख्या राजकारणी लोकांनी पुढे नेण्याचे प्रमुख काम केले पाहिजे’, असे उद्गार कोकणचे सुपूत्र मुंबै बँकेचे अध्यक्ष आम. प्रविण दरेकर यांनी वेळवी येथे बोलताना काढले. दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आम. सुर्यकांत दळवी हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या श्रद्धा शिक्षण संस्था दापोली व वेळवी पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला २५ वर्ष पूर्ण झाल्याने रौप्य महोत्सवी वर्ष पूर्ती वेळवी येथील सोहळा कार्यक्रमांत विशेष निमंत्रित म्हणून आम. प्रविण दरेकर बोलत होते.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आम. सूर्यकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, हिंदुस्थान पेट्रोलियमचे सेल्स ऑफीसर रोहित कटियार, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे, भाजपा जिल्हाध्यक्ष केदार साठे, राजकुमार निगुडकर, संतोष घोसाळकर, स्मिता जावकर, उदय जावकर, योगेश ऊर्फ गुंडया सुर्वे, अजय दळवी, संस्था सचिव श्रद्धा बेलोसे, शांताराम पवार, नरेंद्र करमरकर, राजेश दरेकर, धनजंय शिरसाट, रेश्मा झगडे, रत्नागिरी जिल्हा शांताराम जाधव, कोषाध्यक्ष बबन शेडगे, संचालिका स्मिता दळवी, श्वेता दळवी, अजिंक्य दळवी, पोलीस पाटील रेवा झगडे, तंटामुक्त अध्यक्ष धोंडू चौगुले, नगरसेविका जया साळवी, संतोष शिंदे, मधुकर मोरे, शिक्षकेतर संघटनेचे अमोल जाधव, रविंद्र गिम्हवणेकर, महेश कदम, नरेश दळवी, कमलेश दळवी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी आम. सुर्यकांत दळवी यांनी आपल्या मुळ गावी दापोली तालुक्यातील वेळवी येथे वेळवी परिसरातील गावातील विदयार्थ्यांची माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी यासाठी आपल्या आमदारकीच्या पदाचा पुरेपूर उपयोग करत २५ वर्षापूर्वी शिक्षण संस्था स्थापन करत सर्व सोयी युक्त असे अदयावत असे शैक्षणिक दालन आपल्या सहका-यांच्या मदतीने विदयार्थ्यांसाठी सुरू केले त्या घटनेला आज पंचवीस वर्षे पूर्ण झाली त्याची आठवण म्हणून रौप्य महोत्सवी वर्षे पूर्ती सोहळा आयोजित केला होता हा सोहळा कार्यक्रम विविध प्रकारच्या सामाजिक क्रिडा, सांस्कृतिक, आरोग्य आणि शैक्षणिक विषयक भरगच्च कार्यक्रमाच्या आयोजनाने कार्यक्रम तीन दिवस सुरू होते.