देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वेगवेगळ्या विभागामार्फत अनेक कार्यक्रम राबवले जात आहेत. रत्नागिरी तहसील कार्यालयामार्फत अनेक कार्यक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबाचा गौरव करण्यात आला. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सक्रिय भाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या आंदोलनातील आठवणींना उजाळा मिळाला. तालुक्यात २२ स्वातंत्र्यसैनिक असून त्यांचे नातेवाईक रत्नागिरी व अन्य गावी वास्तव्यास आहेत.
तहसीलदार शशिकांत जाधव यांनी यापैकी तालुक्यातील वास्तव्यास असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यांचा शाल, श्रीफळ व तिरंगा ध्वज देऊन यथोचित गौरव केला. आम्ही सदैव त्यांचे ऋणी असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी फणसोप मंडळाचे मंडळ अधिकारी सुनील कीर, सुरेंद्र कांबळे, विश्वास झिटे, मुरकुटे आदी उपस्थित होते.
कसोप येथील स्वातंत्र्यसैनिक कै.काशीनाथ रघुनाथ साळवी यांच्या दोन्ही मुलांचा शाल, श्रीफळ व तिरंगा ध्वज देऊन सन्मानित केले. या वेळी महेंद्र काशीनाथ साळवी यांनी त्यांच्या वडिलांनी १९४२ च्या “चले जाव” आंदोलनात सक्रिय भाग घेतल्याचे सांगितले. जुना फणसोप येथील स्वातंत्र्य सैनिक कै. अली आदम फणसोपकर यांचा मुलगा असद अली फणसोपकर यांना तहसील कार्यालयात महसूल नायब तहसीलदार अनिल गोसावी यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
तर गोळप सडा येथील स्वातंत्र्यसैनिक कै. मधुकर शंकर नामजोशी त्यांचे पती गोवामुक्ती संग्रामात सहभागी होते. यांच्या पत्नी श्रीमती कमल मधुकर नामजोशी यांचा तहसीलदार जाधव यांनी त्यांच्या घरी जाऊन शाल, श्रीफळ व तिरंगा ध्वज देऊन गौरव केला तसेच कुटुंबीयांची चौकशी केली. काहीही अडचण असल्यास प्रशासन आपल्याला सहाय्य करण्यास नेहमी तत्पर राहील, असे आश्वासन तहसीलदार जाधव यांनी नामजोशी कुटुंबाला दिले.