राज्यात पर्यावरणाच्या ऱ्हासाच्या कारणास्तव वाळू उत्खानानावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र शासनाच्या या आदेशाला धाब्यावर बसवून अनेक ठिकाणी छुप्या स्वरुपात वाळूचे उत्खनन केले जात आहे. जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जगबुडी नदीच्या पात्रामध्ये अशा प्रकरचे अवैध वाळू उत्खनन केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष बाब म्हणजे या अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार असलेल्या महसूल विभागाने मात्र याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. महसूल विभागाच्या वरदहस्तामुळेच कदाचित हा अवैध वाळू उत्खननाचा धंदा सुरु असल्याची शंका आणि कुजबुज उपस्थितामध्ये होत आहे.
काही वर्षांपूर्वी खेड तालुक्यात कोणत्याही प्रकारच्या उत्खननाला शासनाने बंदी घातली आहे. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी तालुक्यातून वाहणाऱ्या जगबुडी नदीपात्रात केल्या जाणाऱ्या वाळू उत्खननावर निर्बंध घालण्यात आले. मात्र तरीही काहीजण निलिक, अळसुरे, खेड शहर या ठिकाणी वाळू उत्खनन करून त्या वाळूची अवैध वाहतूक आणि विक्रीही करताना दिसत आहेत.
शासनाची रॉयल्टी बुडवून अशा प्रकारे वाळू उत्खनन करणे हा कायदयाने गुन्हा आहे. महसूल तसेच खनिकर्म विभागाने अशा व्यवसायिकांवर कडक कारवाई करणे अपेक्षित आहे, मात्र महसूल किंवा खनिकर्म विभागाकडून अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना खुलेआम पाठिंबा दिला जात असल्याने खाडीपात्रात बिनधोकपणे अवैध वाळू उत्खनन करून वाळूची विक्रीही केली जात आहे.
रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत खेड तालुक्यातून वाहणाऱ्या जगबुडी नदीपात्रात ठिकठिकाणी वाळू उत्खनन केले जाते. हा धंदा पूर्णपणे अवैध असला तरी, या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल केली जाते. महसूल आणि खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांचाही या व्यवसायामध्ये छुपा हातभार लागलेला असतो. त्यामुळेच अशा वाळूमाफियांना या व्यवसायामध्ये अडवणूक करायला कोणी जात नाही. अनेक पर्यावरण प्रेमीनी खेड शहरातील मटण मार्केट आणि अळसुरे, निलिक परिसरामध्ये सुरु असलेली अवैध वाळू उत्खनन तात्काळ थांबबावे अशी मागणी केली आहे.