संघटनेच्या वरिष्ठ नेतृत्वाने उत्तर रत्नागिरी जिल्ह्याला नवे जिल्हाप्रमुख दिल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला दापोली मतदार संघात नवसंजीवनी मिळवून दिली आहे, असे प्रतिपादन मुंबई विभाग संपर्कप्रमुख महेश गणवे यांनी केले. दादर शिवसेना भवन येथे शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी जिल्हाप्रमुख बाळासाहेब खेडेकर, ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत खोपडे यांच्यासह तालुक्यातील मुंबईस्थित शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी गणवे म्हणाले, दापोली मतदारसंघात संघटनेला आलेली मरगळ नव्या जिल्हाप्रमुखांनी दूर केली आहे. त्यासाठी ते तीन तालुक्यांत सातत्याने दौरे करत आहेत. लोकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करत आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्यांस जिवंत करण्याचे काम करत आहेत.
शिवसैनिक आजही ठाम आहेत. ज्येष्ठांचा आशीर्वाद संघटनेच्या पाठीशी हवेत त्यासाठी कोणत्याही राजकीय हेतूशिवाय मेळाव्याचे आयोजन करून जुन्या कार्यकर्त्यांचे कौतुक करून त्यांचे आशीर्वाद घेत आहोत. २०२४ च्या निवडणुकीत पक्षाला ८२ हजारांहून अधिक मते मिळालेली असताना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडीत संघटना नेतृत्वहीन झाली होती. पुन्हा नवीन जिल्हाप्रमुखांच्या रूपाने काम करणारे नेतृत्व आपल्याला मिळालेले आहे. २०२९ ला परिस्थिती बदलून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा झेंडा फडकावल्याशिवाय शिवसैनिक गप्प बसणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
तीन तालुक्यांत सातत्याने दौरे – रत्नागिरी जिल्ह्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला नवे जिल्हाप्रमुख दिले आहेत. त्यामुळे दापोली मतदारसंघात आलेली मरगळ नव्या जिल्हाप्रमुखांनी दूर केली आहे. त्यासाठी सातत्याने त्यांचे तीन तालुक्यांत दौरे सुरू आहेत. याचमाध्यमातून ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे आशीर्वाद घेतले जात आहेत, असे गणवे यांनी यावेळी सांगितले.