गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळच्या सुमारास ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना ९ जानेवारीच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. त्यानंतर ३० जानेवारीला लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या मात्र, पुन्हा अचानक त्यांची प्रकृती ढासळली आणि त्यातच त्यांचे निधन झाले.
भारतीय संगीत क्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व लतादीदींच्या निधनानं संपले. त्यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रासह विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त होताना दिसत आहे. अनेक कलाकारांनी शिवाजी पार्कला जाऊन त्यांचे अंत्य दर्शन घेतले. लता मंगेशकर यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी अनेकांना प्रार्थना केली होती. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
हिंदी संगीतविश्वात त्यांना लता दीदी म्हणून ओळखलं जातं. लता मंगेशकर यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, २० हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे. २००१ साली लता मंगेशकर यांना ‘भारत रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना १९८९ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वावर व देशात शोककळा पसरली. अनेकानी साश्रू नैनाने त्याना श्रद्धांजली वाहिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता दीदींना आदरांजली वाहत, शोक संदेशात म्हटले आहे कि, दीदींच्या जाण्यामुळे मला प्रचंड दुःख झाले आहे. दयाळू आणि काळजीवाहू लता दीदी आम्हाला सोडून गेल्या. त्यांच्या जाण्याने आपल्या देशात एक कधीही न भरणारी पोकळी निर्माण झाली आहे. येणाऱ्या पिढ्या भारतीय संस्कृतीत एक दिग्गज म्हणून त्या कायम स्मरणात ठेवतील. त्यांच्या सुमधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आणि मंगेशकर कुटुंबियांचे अतिशय जवळचे संबंध होते. लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला आहे, एक महान पर्व संपुष्टात आले आहे. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले कि, स्वरसम्राज्ञी लतादिदी जरी आपल्यातून देहाने गेल्या असल्या तरी, त्या त्यांच्या अमृत स्वरांनी कायमच अजरामर आहेत, त्यांच्या सुमधुर गाण्यांनी त्या अख्ख विश्व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून त्या कायमच आपल्यात राहतील. अनादि आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील, अशा शोकमग्न भावनांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज कायमचे हरपले. लतादीदींच्या आवाजाच्या परीस स्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहणार आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असं ट्वीट शरद पवारांनी केलं आहे.